CID fame Dinesh Phadnis Death : सीआयडी (CID) या लोकप्रिय मालिकेतील इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडणीस (Dinesh Phadnis) यांचे निधन झाले आहे. वयाच्या 63 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कांदिवलीतील तुंगा रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली.


सीआयडी या मालिकेत दयाच्या भूमिकेत दिसणारे आणि दिनेश फडणीस यांचे खास मित्र दयानंद शेट्टी (Dayanand Shetty) एबीपीसोबत बोलताना म्हणाले,"लीवर, हृदय आणि किडनीसंबंधित समस्यांचा दिनेश यांना सामना करावा लागत होता. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली होती. 30 नोव्हेंबर 2023 रोजी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते". 


दिनेश फडणीस यांच्या पार्थिवावर बोरिवलीतील दौलत नगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. दिनेश यांनी छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांसह सिनेमातदेखील काम केलं आहे. दिनेश फडणीस सीआयडीच्या सुरुवातीपासूनच या कार्यक्रमासोबत जोडले गेले आङेत. सीआयडीच्या दोन दशकांच्या प्रवासात त्यांनी प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं आहे.


दिनेश फडणीस यांना हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते व्हेंटिलेटरवर होते. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असून ते उपचारांना चांगला प्रतिसाद देत असल्याची माहिती दयानंद शेट्टी यांनी दिली होती. अशातच आता त्यांच्या निधनाच्या बातमीने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.



अनेक दर्जेदार कलाकृतींचा भाग असलेले दिनेश फडणीस!


'सीआयडी' (CID) हा नव्वदच्या दशकातील लोकप्रिय कार्यक्रम आहे. आजही या कार्यक्रमाची चांगलीच क्रेझ आहे. या कार्यक्रमातील सर्वच पात्र सुपरहिट ठरले आहेत. या कार्यक्रमात दिनेश फडनीस यांनी इंस्फेक्टरची भूमिका साकारली होती. त्यांची ही भूमिका चांगलीच गाजली. या कार्यक्रमासह त्यांनी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' या लोकप्रिय कार्यक्रमातही काम केलं आहे. पण गेल्या एका वर्षापासून ते अभिनयक्षेत्रापासून दूर आहेत. सध्या ते मराठी सिनेमांची संहिता लिहित होते. आमिर खानच्या 'सरफरोश' आणि हृतिक रोशनच्या 'सुपर 30' या सिनेमांतही ते झळकले आहेत. त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी आणि एखाद्या कलाकृतीच्या माध्यमातून ते प्रेक्षकांच्या भेटीला यावे अशी चाहत्यांची इच्छा आता अपूर्ण राहिली आहे.


संबंधित बातम्या


CID चे इंस्पेक्टर फ्रेड्रिक्स उर्फ दिनेश फडनिस यांना हृदयविकाराचा झटका; रुग्णालयात दाखल