Cheating Case Against Remo D'Souza and Wife Lizelle : बॉलिवूड इंडस्ट्रीमधील प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसुझा आणि त्यांची पत्नी हे सध्या अडचणीत सापडले आहेत. रेमो डिसूझा आणि पत्नी लिझेल यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका डान्स ग्रुपने त्यांच्या कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, कोट्यवधींची फसवणूक केल्याच्या प्रकरणावर रेमो डिसूझा आणि लिझेलने मौन सोडलं आहे. रेमो आणि लिझेलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत या सर्व प्रकारावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे घडल्याप्रकाराबद्दल माहिती दिली आहे.
रेमो डिसूझा आणि लिझेलवर कोट्यवधींच्या फसवणुकीचा आरोप
रेमो डिसूझा आणि पत्नी लिझेल यांनी कोट्यवधींच्या फसवणुकीचे आरोपांवर मौन सोडलं आहे. त्यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून संपूर्ण प्रकरणाचं सत्य सांगितलं आहे. रेमो डिसूझा-लीझेलने रविवारी, 20 ऑक्टोबरच्या रात्री इंस्टाग्राम अकाऊंटवर एक निवेदन जारी केलं आहे, ज्यामध्ये त्यांनी फसवणुकीचा आरोप फेटाळला आहे. ही बाब नंतर कळाल्याचंही त्यांनी सांगितलं. एका डान्स ग्रुपने कोरिओग्राफर रेमो आणि त्याची पत्नी लिझेलवर 11.96 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप केला आहे.
रेमो डिसूझाने आरोप फेटाळले
रेमो आणि लिझेलने त्यांच्या इंस्टाग्रामवर एक निवेदन जारी करत फसवणूक केल्याच्या आरोपांबद्दल निराशा व्यक्त केली आहे. त्यांनी लोकांना 'अफवा पसरवण्यापासून दूर राहण्यास सांगितलं आहे. या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, 'मीडिया रिपोर्ट्सद्वारे आम्हाला कळलं आहे की एका डान्स ग्रुपने माझ्यावर आणि माझ्या पत्नीवर फसवणुकीचा आरोप करत तक्रारी दाखल केल्या आहेत. या प्रकरणाची माहिती मिळताच मला फार वाईट वाटलं की, अशी माहिती प्रकाशित झाली. आम्ही सर्वांना विनंती करतो की, अफवा पसरवण्याआधी सत्याची पडताळणी करा. आम्ही योग्य वेळी या संबंधित अधिक माहिती देऊ. तोपर्यंत आम्ही अधिकाऱ्यांना तपासामध्ये योग्य ते सहकार्य करु. या सर्व अफवा आहेत. यामध्ये कोणतंही तथ्य नाही. हे आरोप खरे नसून खोटे आहेत'.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
बॉलीवूडचा प्रसिद्ध डान्स कोरिओग्राफर रेमो डिसूझा आणि त्याची पत्नी लिझेल यांच्याविरोधात 26 वर्षीय डान्सरने 16 ऑक्टोबरला मीरा रोड पोलिस स्थानकात तक्रा दाखल केली आहे. या तक्रारीच्या आधारे कोरिओग्राफर रेमो, त्याची पत्नी लीझेल आणि इतर पाच जणांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 465 (बनावट), कलम 420 (फसवणूक) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.