Chandu Champion Movie : बॉक्स ऑफिसवर सध्या 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. पॅराऑलिम्पिक पदक विजेते  मुरलीकांत पेटकर (Murlikant Petkar) यांच्या आयुष्यावर हा चित्रपट बेतला आहे. कार्तिक आर्यनची (Kartik Aaryan) भूमिका असलेल्या चित्रपटात मराठी कलाकारांच्याही भूमिका आहेत. मात्र, मराठीतील एका अभिनेत्याने मात्र पार्श्वगायन केले आहे. सध्या या चित्रपटातील गाणे चांगलेच चर्चेत आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटात आपली छाप सोडणारा अभिनेता कैलास वाघमारेने (Kailash Waghmare) या चित्रपटातील गाण्याला आवाज दिला आहे. मेमे खानसोबत त्याने गायलेले 'जमुरा' हे गाणं सध्या चर्चेत आहे. 


'चंदू चॅम्पियन' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट आहे. 1965 च्या युद्धात जखमी झाल्याने मुरलीकांत पेटकर यांना अपंगत्व येते. मात्र, आपल्या जिद्दीच्या बळावर पेटकर यांनी लहानपणापासून उराशी बाळगलेले ऑलिम्पिक पदक विजयाचे स्वप्न पॅराऑलिम्पिकमध्ये पूर्ण करतात. कार्तिक आर्यनने मुरलीकांत पेटकर यांची भूमिका साकारली आहे. मुरलीकांत पेटकर  यांच्या प्रवासावर असलेले गाणं अभिजीत भट्टाचार्य यांनी लिहिले असून प्रीतम यांनी संगीतबद्ध केले आहे. 


अचानक कॉल आला अन्....


अभिनेता कैलास वाघमारेने  'एबीपी  माझा' सोबत बोलताना सांगितले की, एका चित्रपटाच्या चित्रीकरणात असताना अचानकपणे मला फोन आला आणि मला गाणं गाण्यासाठी बोलावले. मला हा सुखद धक्काच होता. 'सेम सेम बट डिफरेंट' (SAME, SAME, BUT DIFFERENT) हे नाटक  पृथ्वी थिएटरला पाहिल्यानंतर माझं नाव या गाण्यासाठी सुचवण्यात आले. गाण्याच्या रेकोर्डिंगच्या वेळी मला कोणत्या चित्रपटाचे गाणे आहे, हिरो कोण आहे, वगैरे कसलीच माहिती नव्हती. पण, पुन्हा एकदा मला त्या टीमने पुन्हा गाण्याच्या रेकोर्डिंगसाठी बोलावले. पण, त्यावेळी मी सिंदखेडराजामध्ये चित्रीकरणात व्यस्त होतो. त्यामुळे रेकोर्डिंगला येणे शक्य होणार नाही असे सांगितले. त्यानंतर मी नंतर हे सगळं विसरून गेलो होतो असेही त्याने सांगितले.


अचानक प्रीमियरचे निमंत्रण...


जवळपास दोन महिन्यांपूर्वी गाणं रेकोर्ड केले आणि विसरुन गेलो. अनेकदा गाणी रेकोर्ड होतात पण ती रिलीज होतात असे नाही. त्यातच प्रीतम यांच्या टीमने पुन्हा रेकोर्डिंगला बोलावले होते पण जाता आले नाही. पण, अचानकपणे प्रीमियरचे आमंत्रण आले आणि सुखद धक्का बसला. माझे नाव चित्रपटात गायक म्हणून होते. प्रीमियरला अनेक दिग्गज मंडळी होती. पण 'गाभ'च्या प्रमोशनमध्ये मुंबईबाहेर असल्याने मला प्रीमियरला जाता आले नसल्याचे कैलासने सांगितले. गाभच्या निमित्ताने फिरतोय आणि लोकांना हे गाणं आवडत असल्याची प्रतिक्रिया समोर येत असल्याचे कैलासने सांगितले.


कसा होता अनुभव...


बॉलिवूडपटातील पार्श्वगायनाच्या अनुभवाबाबत कैलास वाघमारेने सांगितले की,  मेमे खान हा माझ्या आवडीचा गायक आहे. त्याच्यासोबत आता प्लेबॅक सिंगर म्हणून नाव जोडलं जाणं हा सुखद अनुभव होता. गाण्याच्या रेकोर्डिंग वेळी प्रीतम हे ऑनलाईन सूचना करत होते. पण, त्यावेळी स्टुडिओत असलेले त्यांच्या सहकाऱ्यांनी खूपच चांगले सहकार्य केले. चांगल्या पद्धतीने समजावून सांगितले. माझ्या समोर आलेले गाणे अभिजीत भट्टाचार्य याचे आहे, याची कल्पना नव्हती. अन्यथा मीच दबावात आलो असतो असेही कैलासने सांगितले. 


कैलासचा 'गाभ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला...


कैलास वाघमारेची मुख्य भूमिका असलेला 'गाभ' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.  माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून होणारा बदल आणि त्याची  गावच्या रांगड्या मातीच्या  पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा आहे. चित्रपट महोत्सवात चित्रपटाचा गौरव करण्यात आला आहे.