बच्चे कंपनीसाठी बनवलेल्या 'द जंगल बुक'ला 'यूए' प्रमाणपत्र
एबीपी माझा वेब टीम | 08 Apr 2016 01:46 PM (IST)
मुंबई : 'द जंगल बुक'... ज्याची फक्त चिमुकल्यांनाच नव्हे तर त्यांच्या मम्मी-पप्पांना देखील मोठी प्रतीक्षा होती, तो मोगली पुन्हा अवतरला आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या मोगलीने टेलीव्हिजन स्क्रीनवरुन सिनेमागृहातल्या मोठ्या पडद्यावर झेप घेतली आहे. मात्र जगभरातल्या बच्चे कंपनीला भूरळ पाडणाऱ्या 'द जंगल बुक' सिनेमाला 'यूए' प्रमाणपत्र देण्याचा संकुचितपणा भारतीय सेन्सर बोर्डाने दाखवला आहे. आता सेन्सॉर बोर्डाला मोगलीचा धाडसीपणा खटकला, की बगिराचा जिगरबाजपणा? शेरखानच्या डरकाळीने सेन्सॉर बोर्डाच्या मनात धडकी भरली, की रक्षा आणि मोतीचा दयाळूपणा त्यांना सहन झाला नाही? पण लहान मुलांसाठी बनवण्यात आलेल्या दिग्दर्शक जॉन फेवरुंच्या 'द जंगल बुक'ला 'यूए' प्रमाणपत्र मिळाल्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. चित्रपटातील 3D इफेक्टमुळे मुलं घाबरण्याची शक्यता आहे, अशी न पटणारी सबब सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी दिली आहे.