Cannes Film Festival 2022 : 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला (Cannes Film Festival) आता सुरुवात झाली आहे. जगभरातील अनेक दिग्गज 'कान्स फिल्म फेस्टिवल'ला हजेरी लावत आहेत. मराठी सिनेक्षेत्रात उत्कृष्ट दिग्दर्शक, चांगले तंत्रज्ञ आणि कसदार अभिनेते आहेत. त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने दर्जेदार मराठी सिनेमांना कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये सहभागी होण्याची संधी महाराष्ट्र शासनाने उपलब्ध करून दिली आहे. या माध्यमातून मराठी सिनेमाला जागतिक स्तरावर नेण्यात आपण यशस्वी होऊ, असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये व्यक्त केला.
अमित देशमुख म्हणाले, मराठी सिनेमांना आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठ उपलब्ध होण्याबरोबरच विविध देशांमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातून मानाचे स्थान मिळाले पाहिजे. विविध देशांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत हा महाराष्ट्र शासनाचा विविध योजना राबविणाऱ्या मागील व्यापक दृष्टिकोन आहे.
'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान' या विषयावर झाले चर्चासत्र
'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'जागतिक चित्रपट उद्योगात मराठी चित्रपटांचे स्थान' या विषयावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल, ज्येष्ठ समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणे, चित्रपट दिग्दर्शक मनोज कदम तसेच फिल्म मार्केटसाठी निवड करण्यात आलेल्या ' कारखानीसांची वारी ', ' तिचं शहर होणं ' आणि ' पोटरा ' या मराठी चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक अनुक्रमे अर्चना बोरहाडे, मंगेश जोशी, सिध्दार्थ मिश्रा, रसिका जोशी, समीर थोरात आणि शंकर धोत्रे यांचीही यावेळी विशेष उपस्थिती होती.
'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये 'हे' कलाकार सहभागी
75 व्या 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये दीपिका पदुकोण (Deepika Padukone) मुख्य ज्यूरीचा भाग असण्यासोबत कान्सच्या रेड कार्पेटवर तिच्या सौंदर्याचा जलवादेखील दाखवणार आहे. तसेच हिना खान, पूजा हेगडे, आदिती राव हैजरी, नयनतारा आणि ऐश्वर्या राय बच्चनदेखील रेड कार्पेटवर तिचा जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. अक्षय कुमारला कोरोनाची लागण झाल्याने तो 'कान्स फिल्म फेस्टिवल'मध्ये सहभागी होऊ शकला नाही.
संबंधित बातम्या