Ashok Rane Cannes Film Festival 2023 : सिनेसृष्टीतील मानाचा 'कान्स फिल्म फेस्टिव्हल 2023' (Cannes Film Festival) सध्या फ्रान्समध्ये पार पडत आहे. या फेस्टिव्हलदरम्यान सिने-समीक्षक आणि अभ्यासक अशोक राणेंना (Ashok Rane) यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) प्रदान करण्यात आला आहे. 'फिप्रेस्की' या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अध्यक्षा इसाबेल डॅनल यांच्या हस्ते अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' प्रदान करण्यात आला. 


अशोक राणे यांना गेल्या काही दिवसांपूर्वी 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' जाहीर झाला. 'फिप्रेस्की इंडिया' या संस्थेतर्फे सिनेमासंदर्भातलं उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला हा पुरस्कार देण्यात येतो. यापुर्वी अरुणा वासूदेव (2021) प्रो. शनमुगदास (2022) यांना सत्यजित रे स्मृती पुरस्कार देण्यात आला आहे. अशोक राणे हे गेली 46 वर्ष सिनेमा संदर्भात लेखन करत आहेत. त्यांना या लेखनासाठी आजवर तीनदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. असा पुरस्कार मिळवणारे ते मराठीतले एकमेव लेखक आहेत. 


अशोक राणे यांनी मराठीतून जागतिक सिनेमावर आजवर  विपुल लेखन केलं आहे. याशिवाय त्यांनी इंग्रजीतूनही बरेच लेखन केलं आहे. चित्रपट समीक्षा लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचा वेगळा ठसा आणि ओळख निर्माण केली आहे. तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारेही ते मराठीतील पहिलेच चित्रपट समीक्षक आहेत.


1995 ला सिनेमाची चित्रकथा या पुस्तकासाठी अशोक राणे यांना पहिल्यांदा सिनेमा लेखनासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. 2003 ला सर्वोत्कृष्ठ सिने-समीक्षक म्हणून आणि सिनेमा पाहणारा माणूस या त्यांच्या आत्मचरीत्रात्मक पुस्तकासाठी ही राष्ट्रीय पुरस्कार असा तीनदा राष्ट्रीय पातळीवर त्यांचा गौरव झालेला आहे.


अशोक राणे यांची साहित्य संपदा


सिनेमाची चित्रकथा (1995), चित्र मनातले (1996), अनुभव (1997) चित्रपट एक प्रवास (2001) सख्ये सोबती (2003) व्ह्यूस एन्ड थॉट्स ऑन स्क्रीप्ट रायटींग (2006) मोन्ताज (2015) आणि सिनेमा पाहणारा माणूस (2019) अशी अशोक राणे यांची साहित्य संपदा आहे. 


अशोक राणे यांनी 1984 मध्ये पुण्याच्या एफटीआयआयमधून फिल्म अप्रेशिएशन कोर्स केला. त्यानंतर सिनेमा सोप्या भाषेत सर्व महाराष्ट्राला समजला पाहिजे यासाठी कार्यक्रम हाती घेतला. स्वखर्चाने महाराष्ट्रातल्या 25 शहरांमध्ये त्यांनी सिनेमाचे वर्कशॉप आयोजित केले होते. तेव्हापासून सुरू झालेली त्यांची सिनेमाची  कार्यशाळा अजूनही सुरू आहे.


अशोक राणे यांनी एकूण 8 माहितीपट केले आहेत. त्यासाठी त्यांना दोन आंतरराष्ट्रीय पारितोषिके प्राप्त झाली आहेत. चित्रपट रसास्वाद शिबिरांच्या, तसेच महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतून महाविद्यालयातून चित्रपट विषयक केलेल्या अध्यापनातूनही चित्रपट माध्यम विषयक विचार गांभीर्यानं करायला तरुण पिढीला सातत्याने उद्युक्त करण्याचे काम ते करत आले आहेत.


संबंधित बातम्या


Ashok Rane : सिनेमाचे मास्तर! चित्रपट-समीक्षक अशोक राणे यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' जाहीर