कोरोनाचा भारतात शिरकाव झाला आणि त्याचा मोठा फटका सगळ्याच उद्योगांना बसला. यात सगळ्यात आधी बंद झाली ती मनोरंजनसृष्टी. सगळी सुरू असलेली चित्रिकरणं तातडीने बंद झाली. अनेक मोठ्या बॅनर्सचे मोठे सिनेमे यात रखडले. यापैकीच एक मोठा सिनेमा आहे, ब्रह्मास्त्र. या चित्रपटात रणबीर कपूर, अलिया भट, अमिताभ बच्चन, डिंपल कपाडिया असे मोठे कलाकार पाहायला मिळणार आहेत. लॉकडाऊनमुळे चित्रपटाच्या प्रदर्शनाला विलंब होतोय खरा. पण आता हाच विलंब पदरी पाडून घेण्याची जोरदार तयारी या चित्रपटाच्या टीमने चालवली आहे.
मिळालेल्या खात्रीलायक वृत्तानुसार ब्रह्मास्त्रची प्रदर्शनाची जोरदार तयारी सुरू आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित आणि करण जोहर निर्मित या चित्रपटाचे टीजर सध्या सीबीएफसी बोर्डाकडे म्हणजे, सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन यांच्याकडे गेले आहेत. यात एक दोन नव्हे तर तब्बल 13 टीजर्सचा समावेश होतो. चर्चा अशीही आहे, की या चित्रपटाचे 8 मोशन पोस्टर्स बनवण्यात आले आहेत.
ब्रह्मास्त्र 2022 च्या एप्रिल-मे मध्ये प्रदर्शित करण्याची तयारी निर्मात्यांनी चालवली आहे. आता वेळ मिळतोच आहे, तर याची पब्लिसिटी कशी वेगवेगळ्या पद्धतीने करता येईल याची चाचपणी केली जाते आहे. 13 टीजर्स सीबीएफसी बोर्डाला पाठवल्यानंतर या सर्व टीजर्सचं परीक्षण बोर्डाने केलं असून त्यांना यू सर्टिफिकेट मिळाल्याचं कळतं. शिवाय, यात एकही कट बोर्डाने सुचवलेला नाही. पुढच्या मेचा विचार करून आता हे टीजर कसे वापरले जातील यावर चित्रपटाची टीम काम करते आहे. मार्च महिन्यात हे टीजर्स, मोशन पोस्टर्स आणि काही प्रोमो हे बोर्डाकडे देण्यात आले. हे टीजर्स हिंदी, बंगाली, तामीळ, तेलुगु, मल्याळी आणि इतर भाषांमधले आहेत. या प्रोमोशिवाय, 8 मोशन पोस्टर्स असतील त्यात एकेक व्यक्तिरेखा लोकांना उलगडून दाखवली जाणार आहे. ब्रह्मास्त्रचा पुरेपूर पब्लिसिटी धमाका करण्याकडे सध्या या निर्मात्यांचा कल आहे.