मुंबई : कार्तिक आर्यनने अल्पावधीत आपलं नाव मनोरंजनसृष्टीत कमावलं. म्हणूनच बड्या बॅनर्सनी त्याच्यासाठी सिनेमे करायचं ठरवलं. यात अनेक मोठे बॅनर्स होते. धर्मा, रेड चिलीज आदींचा उल्लेख यात करावा लागेल. पण कुठे माशी शिंकते आहे कळायला मार्ग नाही. काही महिन्यांपूर्वी धर्मा प्रॉडक्शन्सच्या 'दोस्ताना 2' मधून कार्तिक बाहेर पडला होता. आता रेड चिलीजच्या 'गुडबाय फ्रेडी' मधूनही कार्तिकची गच्छंती झाली आहे.
सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये असलेलं नेपोटिझम चर्चेत आलं होतं. शिवाय, आपलं नाव कमावण्यासाठी मुंबईत आलेल्या आऊटसायडर्सना कशा पद्धतीने मनस्ताप दिला जातो तेही या निमित्ताने सोशल मिडियावर आलं होतं. सुशांतसिंह जाऊन एक वर्ष उलटायला आलं तोवर आता कार्तिक आर्यनचं नाव चर्चेत आलं आहे. काही दिवसांपूर्वी करण जोहरची कंपनी असलेल्या धर्मा बनवत असलेल्या 'दोस्ताना 2' मधून त्याला काढण्यात आलं होतं. आता शाहरूख खानची कंपनी असलेल्या रेड चिलीज ही कंपनी बनवत असलेल्या सध्या नाव ठरल्यानुसार 'गुडबाय फ्रेडी' या सिनेमातून कार्तिक आर्यनला नारळ देण्यात आला आहे.
या सिनेमाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कतरिना कैफ आणि कार्तिक आर्यन एकत्र येणार होते. कार्तिक या सिनेमासाठी साईन झाला असताना प्रकरण नेमकं का फाटलं ते कळायला मार्ग नाही. बॉलिवूडमध्ये सुरू असलेल्या चर्चेनुसार स्क्रीप्ट ऐकून सायनिंग अमाऊंट घेतल्यानंतर कार्तिकने या कथेत काही बदल सुचवले. जे निर्मिती कंपनीला मान्य नव्हते. परिणामी कार्तिकला हा सिनेमा सोडावा लागला आहे. बॉलिवूड हंगामा या आघाडीच्या वेबसाईटनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
कार्तिक आर्यनला या चित्रपटासाठी सायनिंग अमाऊंट म्हणून 2 कोटी रुपये मिळाले होते. हे पैसे त्याने परत केल्याचंही कळतं. विशेष बाब अशी की संहितेचं हेच कारण देऊन दोस्ताना 2 मधून कार्तिकची गच्छंती झाली होती. रेड चिलीज वा कार्तिक या दोघांपैकी कुणीच अद्याप अधिकृत स्टेटमेंट दिलेलं नाही. पण या निमित्ताने पुन्हा एकदा आऊटसायडर्सना मिळत असलेली ट्रिटमेंट चर्चेत येणार आहे.
'बीए पास' या चित्रपटाचे दिग्दर्शक अजय बहल हे या 'गुडबाय फ्रेडी' या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमाचं नाव कदाचित बदललंही जाईल. पण आता कार्तिकने सायनिंग अमाऊंट परत केल्यानंतर कतरिनासमोर नवा नायक कोण उभा राहतो ते पाहायला हवं. सुशांतसिंह राजपूत गेल्यानंतरही त्याला ज्या बड्या बॅनर्सने सिनेमे द्यायचं थांबवलं त्यात बॉलिवू़डच्या अनेक मोठ्या निर्मात्यांची नावं आली. मात्र सिद्ध काहीच होऊ शकलं नाही. या कलाकारांचे होणारे कॉंट्रॅक्ट्स आणि बड्या निर्मात्यांचा वरचष्मा यामुळे अनेक कलाकार नेमकं काय झालं ते माध्यमांसमोर येऊ देत नाहीत. कार्तिकनेही दोस्ताना 2 मधून बाहेर पडल्यानंतर काहीच भाष्य केलेलं नाही. त्यामुळे या चित्रपटातूनही गच्छंती झाल्यावर तो काही बोलेल याची शक्यता कमीच दिसते.
महत्वाच्या बातम्या :