मुंबई : अनलॉकिंगची प्रक्रिया आता जोर धरते आहे. त्यानुसार अनेक गोष्टी खुल्या गेल्या जात आहेत. दुकानं, हॉटेल्स-बार आदी अनेक गोष्टींना आता अटीशर्तींसह परवानगी मिळाली आहे. या गोष्टी सुरु झाल्या असतील तर मग थिएटर्स का बंद आहेत? असा सवाल केला जात असतानाच, येत्या 15 ऑक्टोबरपासून थिएटर्स खुली करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. याच धामधुमीत आणखी दोन चित्रपटांनी आपल्या तारखा निश्चित केल्या आहेत.


लॉकडाऊन लागल्यानंतर अनेक निर्माते ओटीटीच्या वाट्याला गेले. त्यावेळी थिएटर लॉबी आणि निर्माते यांच्यात वादही झाले. एरवी थिएटरसाठी आसुसलेले लोक आता मात्र ओटीटी आपल्यावर पाठ फिरवत असल्याबद्दल थिएटर लॉबीने नाराजीही व्यक्त केली. अनेक सिनेमे ओटीटीवर आले. असं असलं, तरी थिएटरवाल्यांना पाठिंबा दिला होता तो सूर्यवंशी आणि 83 सिनेमांनी. या दोन्ही सिनेमांनी आपण थिएटरवर रिलीज होऊ असं सांगितल्यानं थिएटरवाल्यांच्या जीवात जीव आला होता. हे दोन्ही सिनेमे आल्यानंतर पुन्हा लोक थिएटरवकडे वळतील असा विश्वास सर्वांना होता. त्यानुसार या सिनेमांच्या तारखा निश्चित होत नव्हत्या. आता या सिनेमाच्या तारखा निश्चित झाल्या आहेत. सुरुवातीला सूर्यवंशी हा चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होणार होता. तर येत्या ख्रिसमसला 83 हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. आता मात्र अंतिम तारखा नक्की झाल्या आहेत.


ठरल्यानुसार 83 हा चित्रपट ख्रिसमसलाच प्रदर्शित होणार आहे. तर सूर्यवंशी मात्र आता दिवाळीत प्रदर्शित न होता 2021च्या प्रजासत्ताक दिनी म्हणजेच, 26 जानेवारीला प्रदर्शित करण्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत रिलायन्स समुहातर्फे याला दुजोरा देण्यात आला आहे. हे दोन्ही सिनेमे अत्यंत महत्वाचे मानले जातात. 83 या सिनेमात रणवीर सिंग, दीपिका पडकोण आदी मंडळी आहेत. तर सूर्यवंशी या चित्रपटात अक्षयकुमार, अजय देवगण, रणवीर सिंग ही स्टारकास्ट असणार आहे. रोहित शेट्टीने हा सिनेमा दिग्दर्शित केला असून, हा चित्रपट एकूण इंडस्ट्रीला पुन्हा एकदा उभारी देईल अशी आशा सर्वांना आहे.


गेल्या सात महिन्यांपासून थिएटर इंडस्ट्री बंद असल्यामुळे एका नव्या उभारीची गरज इंडस्ट्रीला आणि थिएटरवाल्यांना आहे. येत्या 15 ऑक्टोबरपासून देशातील थिएटर्स अटीशर्थींसह सुरु करण्याचं केंद्र सरकारने ठरवलं आहे. त्यानुसार येत्या 15 ऑक्टोबरला पीएम नरेंद्र मोदी हा चित्रपट प्रदर्शित होईल तर 16 ऑक्टोबरला खालीपिली हा ओटीटीवर आलेला चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. केंद्राने थिएटर खुली करण्याचा निर्णय घेतला असला तरी महाराष्ट्रात मात्र राज्य सरकारने थिएटर खुली करण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. येत्या 1 नोव्हेंबरपासून राज्य सरकार तो निर्णय घेईल असा अंदाज वर्तवला जात आहे.


महत्त्वाच्या बातम्या :