डब्लिन :  आयर्लंड इथल्या अत्यंत मानाच्या अशा डब्लिन आंतरराष्ट्रीय लघुपट महोत्सवात दिग्दर्शक राज मोरे यांच्या खिसा या लघुपटाचा प्रिमिअर होणार आहे. 9 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर या दरम्यान होणाऱ्या महोत्सवात हा लघुपट सर्वांना ऑनलाईन पाहता येणार आहे.


राज मोरे हे ख्यातनाम चित्रकार आहेत. त्यांना त्यांच्या चित्रकलेबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यातही आलं आहे. विशेष बाब अशी की राज यांचा हा पहिलाच लघुपट आहे. आपल्या पहिल्याच प्रयत्नात राज यांनी त्यांना असलेलं चित्रपटविषयक समज दाखवून दिली आहे. खिसा ही एक लहान मुलाची गोष्ट आहे. शाळेच्या गणवेशाला इतरांच्या खिशापेक्षा मोठा खिसा असणाऱ्या मुलाची ही गोष्ट आहे. पारंपारिक नितीमूल्यांच्या  खिशात राहणाऱ्या माणसांत राहताना या मुलाला कसा त्या खिशाचा बळी द्यावा लागतो अशी ती गोष्ट आहे.


याबद्दल राज म्हणाले, मी अनेक वर्षापासून जागतिक सिनेमांचा अभ्यास करत होतो. मला सिनेमा करायचा होताच. पण लघुपट केल्याशिवाय मला सिनेमा कोणीच करू देणार नाही हे मला माहीत होतं. मग माझ्या ऐकिवात खिसा हा विषय आला. आपल्याकडे जात आणि धर्मावर राजकारण होतं. भूक, शिक्षण, घर यावर कोणी काही बोलत नाहीय. यातून मला हा विषय सुचला. खिसा आता तयार आहे. 11 ऑक्टोबरला कधीही ही फिल्म पाहता येईल.


खिसा या लघुपटाच्या निमित्ताने एक नवा दिग्दर्शक मराठी चित्रपटसृष्टीत यायच्या प्रयत्नात आहे. या लघुपटात कैलास वाघमारे, श्रुती मधुदिप, शेषपाल रणवीर, वेदांत श्रीसागर यांच्या भूमिका आहेत.राज मोरे हे ख्यातनाम चित्रकार असून त्यांना ललित कला अकादमीचा पुरस्कारही मिळाला आहे. या लघुपटाने इस्तांबूल इथे झालेल्या महोत्सवात सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कारही घेतला आहे. 2021 मध्ये तुर्की ईथे होणाऱ्या गोल्डन स्टार महोत्सवातही हा लघुपट दाखवला जाणार आहे.