Bollywood Actress Tragic Death :  बॉलिवूडच्या ग्लॅमरस जगतामध्ये अनेकांचा प्रवास हा स्वप्नवत असतो. तर, काहीजण हे शापित गंधर्वासारखे असतात. रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने, सौंदर्याने भुरळ पाडणाऱ्या कलाकारांचा करूण अंतदेखील झाला आहे. मनोज कुमार, किशोर कुमार, राजकुमार सारख्या सुपरस्टार कलाकारांसोबत काम करणाऱ्या अभिनेत्रीचा करुण अंत झाला. तिचा शेवट हा थरकाप उडवणारा होता. 


मनोज कुमार, किशोर कुमारसोबत चित्रपटात काम...


रुपेरी पडद्यावर आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सईदा खानने छाप सोडली होती. सईदा खानचा जन्म एका मुस्लिम कुटु्ंबात 24 ऑक्टोबर 1949 रोजी झाला. सईदाला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. मोठेपणी अभिनेत्री व्हायचं असे स्वप्न तिने पाहिले होतं. तिची ही इच्छाही पूर्ण झाली. एका कार्यक्रमात एचएच रावेल यांच्यासोबत तिची भेट झाली. त्यांनी तिला सिनेसृष्टीत ब्रेक देण्यास मदत केली. 'अपना हाथ जगन्नाथ' या चित्रपटात किशोर कुमार, कांच की गुडिया या चित्रपटात सईदाने मनोज कुमार सोबत स्क्रिन शेअर केली. त्यानंतर सईदाच्या करिअरची गाडी सुस्साट निघाली. सईदाने अनेक कलाकारांसोबत काम केले. 


मात्र, कालांतराने सईदाला काम मिळणे जरा कठीण होऊ लागले. त्यानंतर तिने बी आणि सी ग्रेड चित्रपटात काम करू लागली. याच दरम्यानच्या कालावधीत सईदा आणि दिग्दर्शक-निर्माता ब्रज सदाना यांच्यासोबत प्रेम झाले. हे दोघेही विवाहबद्ध झाले. सईदाचे वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू होते. ती नेहमीच आपल्या नवऱ्याचे कौतुक करत असे. मात्र, आपण ज्या नवऱ्याचे कौतुक करतोय, तोच आपला जीव घेणार  आहे, हे तिच्या कधीही ध्यानीमनी नसेल. 


सईदा आणि ब्रज सदाना यांना एक मुलगी नम्रता आणि एक मुलगा कमल अशी दोन अपत्ये झाली. कमल सदानाने काही बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. 


आणि तो काळा दिवस उगवला...


21 ऑक्टोबर 1990 रोजी सईदा आपला मुलगा कमलच्या 20 व्या वाढदिवसाची तयारी करत होती. त्याच दिवशी कमलच्या वडिलांनी त्याची आई सईदा आणि बहिण नम्रताची गोळ्या झाडून हत्या केली. ही हत्या केल्यानंतर स्वत: देखील गळफास घेतला. 


सिद्धार्थ कननला दिलेल्या मुलाखतीत कमलने सांगितले की, ती अतिशय वेदनादायी घटना होती. मी माझ्या डोळ्यासमोर माझे कुटुंब संपताना पाहिले. मला देखील गोळी मारण्यात आली. माझ्या गळ्याच्या एका बाजूने गोळी लागली आणि दुसऱ्या बाजूने निघून गेली. मी कसा वाचलो हे मला माहित नाही. देवाच्या कृपेने मी वाचलो. 


कमलने सांगितले की, जेव्हा माझी आई आणि बहिण रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तेव्हा मी त्यांना रुग्णालयात घेऊन गेलो. मला गोळी लागलीय हे मला माहितच नव्हते. डॉक्टरांनी विचारले की, माझ्या शर्टवर इतकं रक्त कसे काय? तर, मी याचे उत्तर माहित नसल्याचे सांगितले. आई किंवा बहिणीचे रक्त असू शकते असे सांगितले. त्यावेळी त्यांनी मलादेखील गोळी मारली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावेळीही डॉक्टरांना मी आई-बहिणीला कोणत्याही परिस्थितीत वाचवा अशी विनंती केली होती. याच मुलाखतीत वडिलांनी  दारुच्या नशेत आई सईदा आणि  बहीण नम्रताला गोळी मारली असल्याचे सांगितले.