Chinmay Mandlekar Jehangir : अभिनेता चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) आपल्या मुलाचे नाव जहांगीर (Jehangir) ठेवल्यानंतर मागील काही दिवसांपासून त्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय आणि मुलाचे नाव जहांगीर का ठेवले असा प्रश्न काही ट्रोलर्सने केला. सतत होणाऱ्या ट्रोलिंगला वैतागून अखेर चिन्मय मांडलेकरने आपण यापुढे छत्रपती शिवरायांची भूमिका साकारणार नसल्याचे जाहीर केले. हा सगळा गदारोळ सुरू असताना दुसरीकडे कवयित्री प्रज्ञा दया पवार (Pradnya Daya Pawar) यांची पोस्ट चर्चेत आली आहे.
चिन्मयने त्याच्या मुलाचं नाव जहांगीर ठेवल्याने तो सध्या बराच ट्रोल होत आहे. सध्या चिन्मयचा मुलगा जहांगीर हा 11 वर्षांचा आहे. नावावरून ट्रोलिंग होत असताना चिन्मयच्या बायकोने म्हणजेच नेहा जोशी मांडलेकरने एक व्हिडिओ तिच्या सोशल मीडियावर पोस्ट केला होता. चिन्मयला काहींना पाकिस्तान किंवा आफगणिस्तानमध्ये जाण्याचा देखील सल्ला दिला होता. या सगळ्या प्रकरणावर चिन्मयच्या बाजूने मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी आवाज उठवला.
ट्रोलिंगच्या निमित्ताने सोशल मीडियावर अनेकांनी आपली मते मांडली आहेत. मराठीतील आघाडीच्या कवयित्री प्रज्ञा पवार यांनी सोशल मीडियावर जहांगीरच्या निमित्ताने पोस्ट लिहिली आहे. भूमिका वठवण्याआधी भूमिका घ्यावी लागते. ती संविधानवादी आहे की संविधानाला नेस्तनाबूत करणारी आहे? असा प्रश्न स्वत: ला विचारणे गरजेचे असल्याचे त्यांनी म्हटले.
प्रज्ञा पवार यांनी पोस्टमध्ये काय म्हटले?
प्रज्ञा पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, मुळात फक्त भूमिका चोख वठवून चालत नाही. त्या भूमिकांच्या संहितांचं सांस्कृतिक राजकारण बेदखल करून त्यांचा अजेंडा पुढे नेला तर गत अशी काहीच्या बाही होऊन बसते.
भूमिका वठवण्याआधी भूमिका घ्यावी लागते. ती संविधानवादी आहे की संविधानाला नेस्तनाबूत करणारी आहे? देशाची गंगा-जमनी तहजीब, बहुलतावादी संस्कृती उंचावणारी आहे, की ती नष्ट करुन अल्पसंख्यांकादि अन्यांप्रती तिरस्कार आणि घृणा निर्माण करणारी आहे याचा निर्णय कलावंत म्हणून कधीतरी घ्यावाच लागतो.
उगीच नाही; 'पार्टनर, तेरी पाॅलिटिक्स क्या है' हा प्रश्न विचारला होता गजानन माधव मुक्तिबोधांनी..
बाकी पूर्ण सहानुभूती आहेच!
जे घडतंय ते अतिशय विदारक आहे.
अखलाकला ठेचून मारलं केवळ फ्रीजमध्ये बीफ असावं, या संशयामुळे..
मोहसीनला पुण्यात हकनाक संपवलं..
ही अशी कैक उदाहरणं.
त्यावेळीही जाहीर बोललं गेलं असतं तर बरं झालं असतं. काळ माफ करत नसतो!!
...जहांगीरच्या कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत त्यातून तो बरंच काही शिकेल. कदाचित तो अधिक व्यापक होईल. कदाचित अधिक सहिष्णु.
तसं त्यानं व्हावं हीच सदिच्छा!!
ट्रोलर्सना राक्षसी बळ देणाऱ्यांना दणका देणे आवश्यक
दरम्यान, अभिनेता किरण माने यानेदेखील या प्रकरणावर भाष्य केले होते. किरण मानेने म्हटले की, 'धर्मांध अंधभक्तांचे ट्रोलींग हे फोफावणार्या आगीसारखे झाले आहे. हळूहळू सगळेच होरपळणार आहेत यात. कुणाचीच सुटका नाही. त्यातून सुटका हवी असेल तर या ट्रोल्सना राक्षसी बळ देणार्या शक्तीला दणका देणं. चिन्मयच्या प्रकरणातला एक मुद्दा महत्त्वाचा आहे, 'त्याने मुलाचे नांव २०१३ साली ठेवले. त्यावेळी तो अजिबात ट्रोल झाला नव्हता. पण आज या मुद्यावर शिवीगाळ होते आहे. याला म्हणतात 'संविधान धोक्यात येणं'. या झुंडीनं तुम्हाला तुमच्या मुलाचं नांव ठेवायचं 'स्वातंत्र्य' ठेवलेलं नाही. जात आणि धर्म या आपल्या खाजगी गोष्टी चव्हाट्यावर आणून 'समता' नष्ट करण्याचे प्रकार सुरू आहेत. ही दोन मुल्यं नसतील तर 'बंधुता' निर्माण कशी होणार? बास, एवढंच लक्षात ठेवा आणि मतदान करा. हे ट्रोलींग-बिलिंग बंद करणं तुमच्या स्वत:च्या हातात आहे. थंड घ्या'.