मुंबई : हिंदी चित्रपटांतील प्रसिद्ध अभिनेत्री, चित्रपट दिग्दर्शिका आणि टेलिव्हिजन स्टार निना गुप्ता बॉलिवूडमधील एक असं व्यक्तिमत्त्व ज्याच्या अनेक ओळखी आहेत. नीना गुप्ता यांनी बॉलिवूड चित्रपटांमध्ये अनेक महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. 2018 मध्ये आलेल्या 'बधाई हो' या चित्रपटातून नीना गुप्ता यांनी पुन्हा एकदा आपल्या अभिनयानं चाहत्यांवर छाप सोडली. 


नीना गुप्ता जेवढ्या अभिनयामुळे चर्चेत असतात, तेवढ्याच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठीही चर्चेत जातात. क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत रिलेशनशिप, लग्नाआधीची प्रेग्नंसी, नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील अनेक पैलू कधी वादग्रस्त, तर कधी चर्चेचा विषय ठरले आहेत. नीना गुप्ता ज्यावेळी आपल्या लग्नाची तयारी करत होत्या, त्यावेळी ज्याच्याशी त्यांचं लग्न ठरलेलं तो व्यक्ती अचनाक त्यांना सोडून गेला होता, नीना गुप्ता यांच्या आयुष्यातील हा किस्सा फार कमी लोकांना माहीत आहे. 


ज्येष्ठ अभिनेत्री नीना गुप्ता यांनी कायमच त्यांच्या जीवनातील अनेक गोष्टी सर्वांसमोर मोकळेपणाने मांडल्या आहेत. वैवाहिक जीवन असो किंवा कलाविश्वातील आपला प्रवास असो. त्यांनी कायमच या साऱ्याकडे सकारात्मकतेनं पाहिलं. अशी ही मोठ्या मनाची अभिनेत्री 'सध्या सच कहूँ तो..', या आत्मचरित्राच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला आली आहे. या पुस्तकातून त्यांनी आपल्या जीवनातील अनेक टप्प्यांवर प्रकाश टाकला आहे.


अभिनेत्री करीना कपूर खान हिच्याशी आपल्या या पुस्तकाबाबत संवाद साधताना नीना यांनी आपलं लग्न अगदी शेवटच्या क्षणी मोडल्याचं गुपित समोर आणलं. 'इथं मी एका व्यक्तीबाबतही बोलले आहे, ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं. अगदी शेवटच्या क्षणी मी दिल्लीमध्ये कपडे बनवून घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी त्याचा फोन आला आणि मला तुझ्याशी लग्न करायचं नाहीये, असं तो म्हणाला', असं त्यांनी सांगितलं. पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, "आजपर्यंत मला ठाऊकच नाही, की असं नेमकं का झालं. पण, मी काय करु शकते. मला त्याच्याशी लग्नबंधनात अडकायला आवडलं असतं. किंबहुना मला त्याच्या कुटुंबाबद्दल, वडिलांबद्दल कमालीचा आदर होता. मी त्यांच्या घरात राहत होते.", असं म्हणत आयुष्यातील या टप्प्याबाबत त्या मोकळेपणानं बोलल्या.


"आपण लिहिलेल्या पुस्तकातील हा मुद्दा तो आताही वाचेल, तो सध्या आनंदात असून, वैवाहिक आयुष्यातही आनंदात आहे. त्यांला मुलंही आहेत.", असं नीना यांनी सांगितलं. तसेच मसाबा या आपल्या मुलीचं संगोपन करतेवेळी एकल मातृत्त्वामध्ये आपल्याला नेमक्या काय अडचणी आल्या, याचा खुलासाही त्यांनी आपल्या पुस्तकातून केला आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :