मुंबई : देशात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना बॉलिवूडलाही कोरोनाने विळखा घालायला सुरुवात केली आहे. अक्षय कुमार, भूमी पेडणेकर, गोविंदा यांच्या नंतर आता विकी कौशल यालाही कोरोनाची लागण झाली असून तो आता क्वॉरन्टाईन आहे. स्वत: विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन ही माहिती दिली आहे. 


विकी कौशलने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "मी कोणताही निष्काळजीपणा केला नाही. सर्व गोष्टींबाबत खबरदारी घेतली. तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे. सध्या मी क्वॉरन्टाईन असून डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे उपचार घेत आहे." 


 




अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. पण आता एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाशी संबंधित 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


'राम सेतु'चं चित्रीकरण सुरु करण्याआधी अक्षय कुमारने जॅकलीन फर्नांडिस, नुशरत भरुचा अयोध्येत राम ललाच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती.


अनेक बॉलिवूडकर कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. अभिनेता अक्षय कुमार पाठोपाठ प्रसिद्ध अभिनेते गोविंदा यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. गोविंदा सध्या होम क्वॉरंटाईन असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. 


गायक आदित्य नारायण आणि त्याची पत्नी श्वेता अगरवाल यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. या आधी रणबीर कपूर, संजय लीला भंसाळी, मनोज बाजपेयी, आलिया भट्ट यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. 


संगितकार आणि गायक बप्पी लहिरी यांना कोरोनाची लस घेऊनही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.


महत्वाच्या बातम्या :