मुंबई : अभिनेता अक्षय कुमारने रविवारी (4 एप्रिल) सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कोरोनाची लागण झाली असून आयसोलेट केल्याचं सांगितलं होतं. पण आता एबीपीला मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारच्या आगामी 'राम सेतु' चित्रपटाशी संबंधित 45 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


दरम्यान अक्षय कुमारला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अक्षयने आज सकाळी ट्वीटद्वारे रुग्णालयात दाखल झाल्याचं सांगितलं. त्याने ट्विटरवर लिहिलं आहे की, "तुमच्या प्रार्थनांचा परिणाम दिसत आहे. माझी तब्येत ठीक आहे. पण खबरदारी म्हणून मला रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. त्यानुसार मी अॅडमिट झालो आहे. लवकरच परत येईन. तुम्ही आपली काळजी घ्या."


 






 


अक्षय कुमारने नुकतीच मुंबईत आपला आगामी चित्रपट 'राम सेतु'च्या चित्रीकरणाला सुरुवात केली होती. 5 एप्रिल रोजी एका भव्य सीक्वेन्ससाठी  जवळपास 75 ज्युनियर आर्टिस्ट्स आणि इतर लोकांसह 'राम सेतु'चं चित्रीकरण मुंबईच्या मड आयलंड परिसरात एका भव्य सेटमध्ये होणार होतं.  पण चित्रीकरण सुरु होण्याच्या दोन दिवस आधीच जेव्हा सगळ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामधील 75 पैकी 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 


फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे (FWICE) अध्यक्ष बी. एन. तिवारी यांनी एबीपीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. ते म्हणाले की, अक्षय कुमार आणि चित्रीकरणाशी संबंधित 45 जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर 'राम सेतु'चं चित्रीकरण सध्या रोखलं आहे.


याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी एबीपीने अक्षय कुमारची टीम आणि 'राम सेतु'चे दिग्दर्शक अभिषेक शर्मा या दोघांशी संपर्क केला, परंतु बातमी प्रकाशित होईपर्यंत या दोघांकडून कोणतंही उत्तर आलं नव्हतं.


'राम सेतु'चं चित्रीकरण सुरु करण्याआधी अक्षय कुमारने जॅकलीन फर्नांडिस, नुशरत भरुचा अयोध्येत राम ललाच्या दर्शनासाठी गेले होते. यानंतर अक्षय कुमारने उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचीही भेट घेतली होती.