Aamir Khan Struggle : बॉलिवूडमध्ये अनेक कलाकांराची मुले सिनेइंडस्ट्रीत कार्यरत आहेत. काहीजण हे रुपेरी पडद्यावर तर काहीजण पडद्यामागे काम करत आहेत. स्टारकिड असल्याने  बॉलिवूडमध्ये सहज प्रवेश मिळतो असे अनेकांना वाटते. काही प्रमाणात यात सत्यही आहे. तर, काही स्टारकिड्सना बॉलिवूडमध्ये छोटी-मोठी कामे केल्यानंतर संधी मिळते. 


बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' म्हणून ओळख  असलेला अभिनेता आमिर खान (Aamir Khan) यालाही बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी काही प्रमाणात संघर्ष करावा लागला. आमिर खानने नुकतंच कपिल शर्माच्या शोमध्ये आपल्या सुरुवातीच्या प्रवासाबद्दल सांगितले.


सिने इंडस्ट्रीत काम करण्यास वडिलांचा होता विरोध...


आमिर खानने सांगितले की माझे वडील, काका सिनेसृष्टीत कार्यरत होते. मात्र, तरीही माझ्या वडिलांनी मी सिने इंडस्ट्रीत यावे असे वाटत नव्हते. आमिर खानने सांगितले की, मी सुरुवातीच्या काळात बॅकस्टेजला काम केले. दोन नाटकांतही काम केले. माझी कौटुंबिक पार्श्वभूमी सिने इंडस्ट्रीतील असली तरी वडिलांना आम्ही कोणी या क्षेत्रात यावं असे वाटत नव्हते. या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अस्थिरता आहे. त्यामुळे आम्ही कोणी यात करिअर करू नये असे त्यांना वाटत होते. मी चांगला टेनिसपटू होतो. ज्युनिअर पातळीवर मी महाराष्ट्रातील टॉपचा टेनिस खेळाडू होतो असेही आमिरने सांगितले. मात्र, एकदा परीक्षेत नापास झाल्याने वडिलांनी टेनिस सोडण्यास सांगितले आणि माझं खेळणं बंद झाल्याची आठवणही आमिरने सांगितली. ते शीघ्रकोपी असल्याने त्यांच्यासमोर काही बोलण्याचीदेखील भीती वाटत होती.  त्यांच्या सांगण्यावरून मी टेनिस खेळणं सोडून दिले यावरून तुम्ही कल्पना करू शकता, असे त्याने सांगितले. 


गुजराती येत नसतानाही गुजराती नाटकात काम...


आमिरने पुढे सांगितले की, 'मी ऑडिशनमध्ये फेल होत होतो. त्यामुळे मला कॉलेजमधील नाटकांमध्ये संधी मिळाली नाही. पण मी हिंमत न गमावता गुजराती नाटक करण्याचा विचार केला. मला गुजराती भाषा येत नव्हती तरी मी त्या नाटकात काम करण्यासाठी अर्ज केला आणि माझी निवड झाली. त्या नाटकात मी गर्दीत उभा होतो आणि मला एक ओळीचा संवाद बोलायचा होता. त्या एक ओळीसाठी तीन महिने रिहर्सल केली. 


'महाराष्ट्र बंद'मुळे नाटकातून गच्छंती पण... 


आमिरने पुढे सांगितले की, नाटकाच्या दोन दिवस आधी महाराष्ट्र बंद पुकारण्यात आला होता. त्यामुळे त्या दिवशी रिहर्सलला जाता आलं नाही. मी दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा त्यांनी मला नाटकातून बाहेर काढले. मी खूप रडलो. मला खूप वाईट वाटत होतं. तेवढ्यात दोन मुले आली. त्यात माझा एक मित्र होता आणि दुसरा मुलगा त्याचा मित्र होता. तो एफटीआयआयमध्ये शिकत होता. त्यांना त्यांच्या प्रोजेक्टसाठी एक मुलगा हवा होता. त्यांनी मला विचारणा केली आणि मी त्याला होकार दिला. दुसऱ्या विद्यार्थ्याने तो चित्रपट पाहिला आणि मला दुसरी ऑफर दिली. दिग्दर्शक केतन मेहता यांनी दोन चित्रपट पाहिल्यानंतर मला 'होळी'मध्ये रोल दिला. मग होळी पाहिल्यानंतर मन्सूर आणि माझे वडील नासीर यांनी माझ्यासोबत एक चित्रपट करण्याचे ठरवले आणि  मला 'कयामत से कयामत तक'मध्ये संधी मिळाली. 


इतर संबंधित बातमी :