Aamir Khan : अभिनेता आमिर खान (Aamir Khan) हा आपल्या विविध धाटणीच्या भूमिकेसाठी ओळखला जातो. आमिर खान हा ज्या भूमिका, व्यक्तीरेखा साकारणार आहे त्याची तयारी चांगल्या प्रकारे करतो. त्यासाठी वजन कमी करणे-वाढवणे लूकमध्ये बदल करण्यापासून तो शक्य ते काम आमिर करतो. त्याचमुळे त्याला बॉलिवूडमध्ये 'मिस्टर परफेक्शनिस्ट' असे म्हटले जाते. मात्र, 'मिस्टर परफेक्शनिस्ट' हा टॅग कोणी दिला, याबद्दल आमिर खानने स्वत:च सांगितले.
'मिस्टर परफेक्शनिस्ट' पहिल्यांदा कोणी म्हटले?
आमिर खानने आपल्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' चा टॅग मिळण्यासाठी एक कप चहा जबाबदार असल्याचे गमतीत म्हटले. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये आमिर खानने हजेरी लावली होती. त्यावेळी आमिर खानने किस्सा सांगितला. आमिर खानने सांगितले की, आपल्याला 'मिस्टर परफेक्शनिस्ट' चा टॅग हा अभिनेत्री शबाना आझमी यांनी दिला.
'मिस्टर परफेक्शनिस्ट'चा टॅग असा लागला...
आमिरने जुनी आठवण सांगताना म्हटले की, मी त्यावेळी सिनेसृष्टीत अगदी नवखा होतो आणि दिल चित्रपटाचे शूटिंग सुरू होते. त्या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्र कुमार यांनी केले होते. तर, बाबा आझमी हे कॅमेरामन होते. बाबा आझमी हे आघाडीचे कॅमेरामन होते. आम्ही कधी कधी त्यांच्या घरी जायचो. एकेदिवशी आम्ही काहीजण एका विषयावर गहन चर्चा करत होतो. कदाचित तो विषय चित्रपटाशी संबंधति असावा, मी त्यात खूपच गुंतलो होतो. त्याच वेळी शबाना आझमी चहा घेऊन आल्या. त्यांनी मला चहामध्ये किती चमचे साखर हवी असे विचारले.
मी विचाराच्या तंद्रीत होतो, त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष गेले नाही. मग, त्यांनी पुन्हा आवाज देऊन विचारले. मी मागे वळून शबाना आझमी यांच्याकडे पाहिले. त्यांना उत्तर देण्यासाठी मला काही सेकंद लागले. मी विचारले, ‘कप किती मोठा आहे?’ त्यांनी मला कप दाखवला. मी अजूनही त्या चर्चेच्या तंद्रीत होतो. मग मी विचारले किती मोठा चमचा आहे, त्यांनी मला चमचा दाखवला आणि मग मी म्हणालो, ‘एक चमचा.’
ही गोष्ट शबाना आझमी यांनी सगळीकडे सांगितली. ‘तुम्ही आमिरला ‘साखर किती?’ असे विचाराल तर तो तुम्हाला कप आणि चमच्याचा आकार विचारेल.’ असे गंमतीत शबाना सांगत असे.
'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो' मध्ये आमिर खानने आपल्याबद्दलचे अनेक किस्से सांगितले. आमिर खानने पहिल्यांदाच कपिल शर्माच्या शोला हजेरी लावली होती. या शोमध्ये आमिर खानच्या दोन्ही बहिणीदेखील प्रेक्षकांमध्ये उपस्थित होते. आमिर खानने काही चित्रपटातील शूटिंग दरम्यानचे किस्से सांगितले.