Ajay Devgn On RRR: बॉलिवूडचा सिंघम अशी ओळख असणाऱ्या अजय देवगणचा (Ajay Devgn) भोला (Bholaa) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सध्या अजय या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतीच अजयनं भोला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी द कपिल शर्मा शोमध्ये (The Kapil Sharma Show) हजेरी लावली. यावेळी अजयनं ऑस्करबाबत एक वक्तव्य केलं. त्याच्या या वक्तव्यानं अनेकांचे लक्ष वेधले. 


काय म्हणाला अजय?


आरआरआर चित्रपटानं ऑस्कर जिंकल्याबद्दल कपिल शर्माने अजयचे अभिनंदन केले. त्यानंतर कपिल शर्माने अजयला विचारले, 'आरआरआर या चित्रपटाच्या नाटू नाटू गाण्याला ऑस्कर मिळाला, तुमचे खूप खूप अभिनंदन, तुम्ही पण चित्रपटाचा एक भाग होता. अजय देवगणने यात कॅमिओ आहे. ज्या चित्रपटात काम केलं, त्या चित्रपटाला ऑस्कर मिळेल, असा विचार तुम्ही कधी केला होता का?'


कपिलच्या या प्रश्नाला उत्तर देत अजय म्हणाला, 'आरआरआरला माझ्यामुळेच ऑस्कर मिळाला आहे. मी त्या गाण्यात नाचलो असतो तर? याचा विचार करा' अजयचं हे वाक्य ऐकून प्रेक्षक खळखळून हसतात. 


पुढे कपिल अजयला विचारतो,  'आरआरआर चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर तुम्हाला असं वाटलं नाही का, की नाटू नाटूची स्टेप करत डान्स करावा?' कपिलच्या या प्रश्नला उत्तर देत अजय म्हणाला, 'जर मी तसं केलं असतं तर त्यांनी ऑस्कर परत घेतला असता.' 


पाहा व्हिडीओ: 






आरआरआर हा 24 मार्च 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस आला. या चित्रपटात राम चरण आणि ज्युनियर एनटीआर यांच्यासोबतच आलिया भट्ट आणि अजय देवगण यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या चित्रपटातील नाटू नाटू या गाण्यानं ऑस्कर पुरस्कार पटकावला. 


अजयचा आगामी चित्रपट


अजय हा त्याच्या भोला या आगामी चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटात अजयसोबतच तब्बू देखील प्रमुख भूमिका साकारणार आहे. 'भोला' या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरादेखील अजय देवगणने सांभाळली आहे. अजयच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या:


Oscar 2023 After Party: ऑस्कर जिंकल्यानंतर RRR चित्रपटाच्या टीमची जंगी पार्टी; एस.एस राजामौली यांच्या घरातील सेलिब्रेशनचे फोटो व्हायरल