जोधपूर : काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवण्यात आलं आहे. तर या प्रकरणात सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे.
या खटल्याच्या सुनावणीदरम्यान, सलमान खानच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. कोर्टरुममध्ये त्याच्या खुर्चीजवळ अर्पिता आणि अलविरा या दोन्ही बहिणी उभ्या होत्या. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच सलमान मान खाली घालून खुर्चीवर बसला. तो अतिशय दु:खी दिसत होता.
तर निकालानंतर अर्पिता आणि अलविरा यांना रडू कोसळलं.
कोर्टरुममध्ये सलमान खानचे वकील हस्तीमल सारस्वत यांनी 15 मिनिट त्याची बाजू मांडली. यानंतर न्यायाधीश देव कुमार खत्री यांनी सलमानला विचारलं, “आरोपांवर तुमचं काय म्हणणं आहे?”
यावर सलमान म्हणाला की, “माझ्यावरील सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्याशी मी सहमत नाही.”
यानंतर न्यायाधीशांनी सैफ अली खान, तब्बू, सोनाली बेंद्रे आणि नीलम या आरोपींची निर्दोष मुक्तता केली. “सलमान वगळता पुराव्यांअभावी उर्वरित सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली जात आहे,” असं न्यायाधीश खत्री म्हणाले.
सलमानच्या वकिलांनी न्यायाधीशांना सांगितलं की, “त्याला कमीत कमी शिक्षा देण्यात यावी. तो चांगला माणूस आहे. तो समाजाची सेवा करत आहे.”
यावर सरकारी वकील भवानी सिंह भाडी म्हणाले की, सलमानला गुन्ह्यांची सवय आहे. आधीही त्याच्यावर अनेक खटले सुरु होते. त्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी. यानंतर न्यायाधीशांनी सलमानला दोषी घोषित केलं.