कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर त्याची रवानगी जोधपूर तुरुंगात करण्यात आली. त्याला कैदी क्रमांक 106 देण्यात आला आहे. जोधपूर तुरुंगात त्याने संपूर्ण रात्र काढली. चार चादरी घेऊन तो रात्रभर जमिनीवर झोपला. तुरुंगातलं जेवणही त्याने नाकारलं. सलमानला वरण-भात, पत्ता गोबी आणि चपाती देण्यात आली, मात्र त्याने या जेवणाला नकार दिला.
तुरुंगातील अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, सुरुवातीच्या वैद्यकीय तपासणीत सलमानचा रक्तदाब वाढला होता, जो नंतर सामान्य झाला.
सलमानचं आज काय होणार?
सलमानच्या वकिलांकडून कालच जोधपूर सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता, ज्यावर आज सुनावणी होईल. त्यामुळे सलमानच्या लाखो चाहत्यांचं लक्ष आता जोधपूर सत्र न्यायालयाच्या निर्णयाकडे आहे. सकाळी साडे दहा वाजता या अर्जावर सुनावणी होऊ शकते.
सलमानचे दोन्ही भाऊ जोधपूरला पोहोचणार
सलमानच्या जामीन अर्जावर काही वेळातच सुनावणी होईल, मात्र त्यापूर्वी त्याचे दोन्ही भाऊ अरबाज खान आणि सोहेल खान जोधपूरसाठी रवाना झाले आहेत. त्यासोबतच निर्माते साजिद नाडियाडवालाही जोधपूरला पोहोचतील. नाडियाडवाला यांनी बागी 2 या सिनेमाची सक्सेस पार्टीही रद्द केली.
काळवीट शिकार
कांकाणी गावात दोन काळवीट शिकार केल्याचं हे प्रकरण आहे. सलमानने 1998 मध्ये एक आणि दोन ऑक्टोबरच्या रात्री विविध ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे.
गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. याप्रकरणी सलमान दोषी ठरला आहे.
दरम्यान, कोर्टानं शिक्षा सुनावण्याआधी जेव्हा सलमान आणि इतर आरोपींना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली, तेव्हा सर्वांनीच आपल्यावरचे आरोप नाकारले होते.
आपण काळविटाची शिकार केली नाही, त्यात आपला कुठलाही हात नाही, असं म्हटलं होतं.
मात्र कोर्टानं त्यानंतर सलमान खानला दोषी ठरवत असल्याचं जाहीर केलं. तर इतर आरोपींना केवळ पुराव्याअभावी निर्दोष सोडलं.
संबंधित बातम्या :