जोधपूर : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी  दोषी ठरलेल्या अभिनेता  सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जोधपूर सत्र न्यायालयाने सलमानला दोषी ठरवत ही शिक्षा सुनावली. मात्र त्याचे सहकारी अभिनेते सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आलं.


सलमानच्या प्रकरणावर दिलेल्या कोर्टाच्या निर्णयाला पाकिस्तानने धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. सलमान खान मुस्लीम असल्यामुळेच त्याला शिक्षा सुनावण्यात आली, अशी मुक्ताफळं पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री ख्वाजा असिफ यांनी उधळली.


पाकिस्तानमधील पत्रकार हमीद मीर यांनी जिओ न्यूजसाठी ख्वाजा असिफ यांची मुलाखत घेतली. ''सलमानला शिक्षा देण्यात आली कारण, तो मुस्लीम आहे. प्रकरण पाहिलं, तर वीस वर्षे जुनं आहे, मात्र त्यात सलमानला शिक्षा सुनावण्यात आली. हा निर्णय हेच दाखवतो, की भारतामध्ये मुस्लीम, अस्पृश्य आणि ख्रिश्चनांची काही किंमत केली जात नाही,'' असं ख्वाजा असिफ बरळले.

''सलमान खान भारतातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असता तर त्याला एवढी शिक्षा देण्यात आली नसती, कोर्टही त्याच्याबाबतीत सौम्य झालं असतं,'' असं ख्वाजा असिफ म्हणाले.

दरम्यान, असिफ यांच्या या वक्तव्याचा भारतीय ट्विटराईड्सने जोरदार समाचार घेतला. सलमान मुस्लीम असल्यामुळे त्याला शिक्षा सुनावण्यात आली, मग त्याच्याचसोबत असलेल्या सैफअली खानला का निर्दोष सोडलं, तो हिंदू आहे का? असाही सवाल काहींनी असिफ यांना विचारला.

संबंधित बातम्या :

सलमानला शिक्षेपर्यंत पोहोचवणारा बिष्णोई समाज कोण आहे?


निकालानंतर सलमान कोर्ट रुममध्ये मान खाली घालून बसला!


...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!


काळवीट शिकार : सलमानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड


सलमान ज्या तुरुंगात रात्र काढणार, त्याबद्दल ए टू झेड माहिती