Bhumi Pednekar : नुकत्याच नेटफ्लिक्स या ओटीटीवर प्रदर्शित झालेल्या 'भक्षक' (Bhakshak Movie) या चित्रपटामुळे अभिनेत्री भूमी पेडणेकर (Bhumi Pednekar) चर्चेत आहे. 'भक्षक'मध्ये तिने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे. आता भूमी पेडणेकर सीमोल्लंघन करण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. भूमी पेडणेकर हॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला हॉलिवूडमधील काही प्रोडक्शन हाऊसकडून विचारणा झाल्याचे वृत्त आहे.
भूमी पेडणेकरने भक्षक शिवाय याआधी देखील काही चित्रपटांमध्ये तिने प्रभावी काम केले आहे. 'दम लगा के हैशा', टॉयलेट:एक प्रेमकथा, शुभमंगल सावधान, लस्ट स्टोरी (वेब सीरिज), सोनचिरिया, सांड की आँख, बाला, बधाई दो, भीड, अफवाह अशा चित्रपटांमधून भूमीने आपली छाप सोडली आहे.
ट्रेड सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास मागील 9 वर्षांपासून भूमीने आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट, व्यक्तीरेखा साकारल्या आहेत. चित्रपटातील आशय देखील वेगळे होते. तिच्या चित्रपटांनी जागतिक पातळीवरही लक्ष वेधून घेतले. भक्षक चित्रपट जागतिक पातळीवर ट्रेंड करत आहे. तिने आपल्या कामातून हॉलिवूडमधील लोकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे ट्रेड सूत्रांनी सांगितले.
हॉलिवूड चित्रपटांसाठी मिटींग?
भूमी पेडणेकर बॉलिवूडमधून हॉलिवूडमध्ये जाण्यास सज्ज आहे. काही प्रोडक्शन हाऊसने तिच्याशी संपर्क साधला आहे. या काही प्रोडक्शन हाऊससोबत कदाचित मार्च किंवा एप्रिल मध्ये भूमी लॉस एंजलिसमध्ये मीटिंगसाठी जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोणत्या चित्रपटात करणार काम?
इतर अनेक कलाकारांप्रमाणे भूमी पेडणेकरलाही हॉलिवूडमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा आहे. मात्र, या चित्रपटांमध्ये काम करत असताना भूमी पेडणेकर ही चित्रपटाच्या कथानकावर भर देत असल्याचे सूत्रांनी सांगितले. भारतीय सिनेसृष्टीची एक प्रकारे प्रतिनिधी असल्याने हॉलिवूडमध्ये काम करताना काळजी घेत असल्याची माहिती ट्रे़ड सूत्रांनी दिली.