Bhalji Pendharkar : भालजी पेंढारकर (Bhalji Pendharkar) यांनी पाच दशकाहून अधिक काळ सिने-दिग्दर्शक, निर्माते, पटकथालेखक, संवादलेखक म्हणून सिनेसृष्टीत काम केलं आहे. मूकपट ते बोलपट आणि कृष्णधवल ते रंगीत सिनेनिर्मिती करण्यात भालजी पेंढारकर यांचा मोलाचा वाटा होता. 26 नोव्हेंबर 1994 रोजी त्यांनी जगाचा निरोप घेतला होता.
भालजी पेंढारकरांनी त्यांच्या करिअरच्या सुरुवातीला 'बहु असोत सुंदर', 'आकाशवाणी', 'पार्थकुमार', 'कालियामर्दन', 'सावित्री' हे बोलपट केले. त्यानंतर 1939 सालानंतर त्यांनी सिनेमांत वेगवेगळे प्रयोग करायला सुरुवात केली. पुढे त्यांनी 'नेताजी पालकर', 'थोरातांची कमळा', 'वाल्मिकी', 'मीठभाकर', 'छत्रपती शिवाजी', 'गाठ पडली ठका ठका', 'मोहित्यांची मंजुळा', 'साधी माणसं', 'गनिमी कावा', 'शाब्बास सूनबाई' असे पंचेचाळीस सिनेमे सिनेसृष्टीला दिले.
भालजी पेंढारकरांनी जयप्रभा स्टुडिओची स्थापना केली. या स्टुडिओच्या माध्यमातून त्यांनी अनेक सिनेमांची निर्मिती केली. दिग्दर्शन, कथा, पटकथा, संवाद गीते अशा वेगवेगळ्या माध्यमातून सिनेसृष्टीत काम करण्यासोबत त्यांनी समाज प्रबोधनाचे महत्त्वाचे कार्य केले. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना मानाच्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले.
ऐतिहासिक सिनेमांच्या निर्मितीवर भालजी पेंढारकरांचा भर होता. सिनेमाच्या माध्यमातून एक चांगला संदेश पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असे. त्यांचा जयप्रभा स्टुडिओ म्हणजे कलाकार आणि तंत्रज्ञ यांना घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. अनेक मोठ-मोठे कलाकार भालजींच्या शिस्तीतून तयार झाले आहेत.
भालजी पेंढारकर कधीच चाकोरीबद्ध शालेय शिक्षणात रमले नाहीत. त्यांनी तरुण वयातच कोल्हापूर सोडलं. पुढे पुण्यात त्यांनी केसरी या वृत्तपत्रात नोकरी केली. त्यावेळी त्यांना लिखाणाची आवड निर्माण झाली. त्यानंतर ते पुन्हा कोल्हापूरला परतले आणि जयप्रभा स्टुडिओची स्थापना केली.
स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती भालजी पेंढारकर यांनी केली.
भालजी पेंढारकर यांनी 1925 साली 'बाजीराव मस्तानी' हा पहिला सिनेमा दिग्दर्शित केला. त्याकाळी भालजींना 'बाबा' असे म्हटले जायचे. भालजींना चित्रभूषण, जीवनगौरव, दादासाहेब फाळके, गदिमा अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. वयाच्या 97 व्या वर्षी भालजींचे कोल्हापुरात निधन झाले.
संबंधित बातम्या