Arjun Rampal : बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल (Arjun Rampal) आज आपला 50 वा वाढदिवस साजरा करत आहे. अर्जुनने आजवर आपल्या दमदार अभिनयाने चाहत्यांची मने जिंकली आहेत. अर्जुन आज एक नावाजलेला अभिनेता असला तरी त्याला अनेक चढउतारांचा सामना करावा लागला आहे. 


अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्याआधी अर्जुन मॉडेलिंग करायचा. 1994 साली त्याची 'सोसायटी फेस ऑफ द इअर' म्हणून निवड झाली होती. मॉडेलिंगच्या क्षेत्रात यशस्वी झाल्यानंतर त्याने सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्याने त्याच्या सिनेसृष्टीतील प्रवासात खूप निवडक सिनेमे केले आहेत. 'प्यार इश्क और मोहब्बत' या सिनेमाच्या माध्यमातून अर्जुनने 2001 साली बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 






अर्जुन रामपालचं फिल्मी करिअर


अर्जुनने त्याच्या फिल्मी करिअरमध्ये 'ऑंखे' (Aankhen), 'इलान' (Elaan), 'हिरोईन' (Heroine), 'नेल पॉलिश' (Nail Polish) आणि 'सत्याग्रह' (Satyagraha) यांसारख्या सिनेमांत काम केलं आहे. तसेच 'रॉक ऑन' (Rock On) या सिनेमासाठी अर्जुनला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कारदेखील मिळाला आहे. नुकताच त्याचा 'धाकड' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 


अर्जुन रामपाल सिनेमांसह वैयक्तिक आयुष्यामुळेदेखील चर्चेत असतो. अर्जुनचे नाव एका ड्रग्ज प्रकरणाशी जोडले गेले होते. त्यामुळे एनसीबीने त्याच्या घरावर छापादेखील टाकला होता. पण पुढे अर्जुनला या प्रकरणातून दिलासा मिळाला. 


अर्जुन 1998 साली मेहर जेसिया या मॉडेलसोबत लग्नबंधनात अडकला. पण लग्नाच्या दहा वर्षानंतर 2018 साली त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तो आता दक्षिण आफ्रिकेची मॉडेल गॅब्रिएला या मॉडेलसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आहे. अर्जुनचा 'द बॅटल ऑफ भीमा कोरेगाव' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तसेच तो 'नास्तिक' या आगामी सिनेमाच्या शूटिंगलादेखील सुरुवात करणार आहे. अर्जुनला सिनेसृष्टीत पदार्पण करून 21 वर्ष पूर्ण झाली आहेत. 


संबंधित बातम्या


अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावाला गोव्यात अटक, 'या' प्रकरणी पोलिसांनी केली कारवाई