सचिनच्या जीवनावर आधारित बायोपिकसाठी त्याच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या क्षणांचे व्हिडीओ सिनेमा निर्मात्यांनी मागितले होते. यासाठी बीसीसीआयने सवलतीच्या दरात उपलब्ध करुन देण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. पण बीसीसीआयने यास स्पष्ट नकार दिला आहे. धोनीच्या बायोपिकसाठी दरांमध्ये कोणतीही तडजोड करण्यात आली नाही, तर सचिनसाठी बीसीसीआयने आपल्या नियमात बदल का करावा? असा सवाल एका वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.
इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, महेंद्र सिंह धोनीच्या जीवनावरील बायोपिकसाठी त्याचा बिझनेस पार्टनर अरुण पांडे यांनी काही व्हिडीओसाठी बीसीसीआयशी संपर्क साधला होता. यावेळी बीसीसीआयनं त्या व्हिडीओसाठी एक कोटी रुपये द्यावे लागतील हे स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे, माजी कर्णधार सौरभ गांगुलीलाही काही व्हिडीओंची गरज होती, तेव्हा त्यालाही बीसीसीआयकडून आकारण्यात आलेलं शुल्क भरावं लागलं. त्यामुळे सचिनसाठी नियमात बदल का करावा? असा सवाल बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने उपस्थित केला आहे.
बीसीसीआयच्या व्हिडीओसाठी एक दर निश्चित करण्यात आले असून, सामन्यांचं महत्त्व लक्षात घेऊन हे दर निश्चित करण्यात आलेत. बीसीसीआयकडून व्हिडीओमधील प्रत्येक सेकंदानुसार दर आकारले जातात.
पण सचिनच्या निवृत्तीवेळीच्या वानखेडे स्टेडिअमवरील 3 मिनिट 50 सेकंदाच्या भाषणाचा व्हिडीओ कोणतंही शुल्क न आकारता उपलब्ध करुन देण्यास बीसीसीआयनं सहमती दर्शवली असल्याचं समजत आहे. तर इतर व्हिडीओसाठी बीसीसीआयशी चर्चा सुरु असल्याचं 200 नॉट आऊटचे संस्थापक आणि सिनेमा निर्माते रवी भांगचांदका यांनी सांगितलं.
दरम्यान, सचिनच्या बायोपिकचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरला 10 लाखाहून अधिक हिट्स मिळाले आहेत.
सचिनच्या बायोपिकचा ट्रेलर पाहा
संबंधित बातम्या
'क्रिकेट खेळणं माझ्यासाठी मंदिरात जाण्यासारखं,' सचिनच्या सिनेमाचा ट्रेलर रिलीज