Bal Shivaji Movie : 'बाल शिवाजी' (Bal Shivaji) या सिनेमाची घोषणा गेल्या काही दिवसांपूर्वी करण्यात आली तेव्हापासून शिवप्रेमी आणि सिनेप्रेमींमध्ये या सिनेमाची उत्सुकता आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या 350 व्या जयंती निमित्त 'बाल शिवाजी' या सिनेमाचा फर्स्ट लूक आऊट करण्यात आला आहे. या सिनेमात 'सैराट' फेम आकाश ठोसर (Akash Thosar) 'बाल शिवाजी'च्या भूमिकेत दिसणार आहे.


'बाल शिवाजी' या बहुचर्चित सिनेमात शिवरायांचा वयवर्षं 12 ते 16 पर्यंत त्यांच्या आयुष्यात घडलेल्या  रंजक गोष्टी पाहायला मिळतील. त्यामुळे आता छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. सुपरहिट सिनेमे देणारे रवी जाधव (Ravi Jadhav) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत.


'बाल शिवाजी' महाचित्रपटाचे पहिले पोस्टर आऊट!


'सैराट' फेम आकाश ठोसरला शिवरायांच्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. आकाशने या सिनेमाचं पोस्टर शेअर करत लिहिलं आहे,"लहान असो वा मोठा वाघ 'वाघच' असतो. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त सादर आहे, स्वराज्याच्या पायाभरणीची अद्भुत गाथा 'बाल शिवाजी' हा महाचित्रपटाचे पहिले पोस्टर". आकाश ठोसरच्या या पोस्टवर जय शिवराय, जगदंब, जय भवानी जय शिवाजी, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत. 






'बाल शिवाजी' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक रवी जाधव म्हणाले,"माझा सिनेमा छत्रपती शिवाजी महाराजांचे आई-वडील, जिजामाता आणि शहाजी राजे भोसले यांनी लहानपणी त्यांचा भक्कम पाया रचून दिलेले अमूल्य योगदान दाखवेल. तसेच लहानपणापासूनच एक योद्धा आणि शासक म्हणून त्यांची कौशल्ये कशी तीक्ष्ण झाली हे दाखवेल". 


मी गेली नऊ वर्ष 'बाल शिवाजी' या सिनेमाच्या संहितेवर काम करतोय : रवी जाधव


रवी जाधव पुढे म्हणाले,"मी गेली नऊ वर्ष 'बाल शिवाजी' या सिनेमाच्या संहितेवर काम करत आहे. दिग्दर्शक म्हणून मी पहिल्यांदाच ऐतिहासिक सिनेमा करणार आहे. सिनेमाची कथा संदीप सिंह यांनी समजून घेतली. मुख्य भूमिकेसाठी आकाश ठोसरची आम्ही एकमताने निवड केली आहे. तरुण राजाची भूमिका साकारण्यासाठी त्याच्याकडे राजसी रूप आणि व्यक्तिमत्त्व आहे. या भूमिकेसाठी त्याचा उत्साह आणि उत्सुकता पाहून मी प्रभावित झालो आहे". 


संबंधित बातम्या


Bal Shivaji : छत्रपती शिवरायांच्या बालपणीचा जीवनप्रवास, रवी जाधव दिग्दर्शित 'बाल शिवाजी' चित्रपट डोळ्यासमोर उभा करणार स्वराज्याचा पाया!