Baipan Bhaari Deva : 'बाईपण भारी देवा' (Baipan Bhaari Deva) या सिनेमाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. सिनेमातल्या सहा बहिणींची सहा आयुष्य आणि त्यातून उलगडणाऱ्या भावविश्वाची गोष्ट ही आता समाजातील प्रत्येक 'स्त्री'ची गोष्ट झाली आहे. आता या सिनेमाच्या टीमने एबीपी माझाच्या 'माझा कट्टा' या कार्यक्रमात हजेरी लावली असून सिनेमाच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
माझ्या करियरला नवी दिशा मिळाली : वंदना गुप्ते
'बाईपण भारी देवा' या सिनेमात रोहिणी हट्टंगडी (Rohini Hattangadi), वंदना गु्प्ते (Vandana Gupte), सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar), सुकन्या मोने (Sukanya Mone), शिल्पा नवलकर (Shilpa Navalkar) आणि दीपा परब मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या यशाबद्दल बोलताना वंदना गुप्ते म्हणाल्या,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा एवढा चालेल असं कधीच वाटलं नव्हतं. निखिल सानेंनी अगदी योग्यवेळी हा सिनेमा रिलीज केला आहे. या सिनेमाला मिळालेलं अभूतपूर्व यश पाहून नक्कीच आनंद होत आहे. या सिनेमामुळे माझ्या करियरला नवी दिशा मिळाली आहे".
'गांधी' सिनेमानंतर माझा हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला : रोहिणी हट्टंगडी
रोहिणी हट्टंगडी म्हणाल्या,"बाईपण भारी देवा' हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हाच या सिनेमाचा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल याचा अंदाज होता. पण एवढा मिळेल, अशी अपेक्षा नव्हती. गांधी सिनेमानंतर माझा हा सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला आहे. त्यामुळे खूप भारी वाटत आहे".
देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, असं आमचं झालं आहे : सुकन्या मोने
सुकन्या मोने म्हणाल्या,"मालिकांमध्ये महिलांची क्रेझ पाहायला मिळते. या सिनेमाला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळत आहे. जे एवढ्या वर्षात कधी मिळालं नव्हतं. तिकीट काढून आलेल्या सामान्य प्रेक्षकांचा या सिनेमाला सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. प्रेक्षकांचं मिळणारं प्रेम पाहून देणाऱ्याने देत राहावे.. घेणाऱ्याने घेत राहावे असं आमचं झालं आहे".
'बाईपण भारी देवा'ने इतिहास रचला आहे : शिल्पा नवलकर
शिल्पा नवलकर म्हणाल्या,"बाईपण भारी देवा' या सिनेमाला महिलांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. 'बाईपण भारी देवा' या सिनेमाने प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासोबत इतिहास रचला आहे". दीपा परब म्हणाली,"माझ्याबाबतीत 'सबुरी का फल मीठा होता है' असं झालं आहे. 12 वर्षांनी या सिनेमाच्या माध्यमातून मी कमबॅक केलं आहे. माझं पहिलं नाटक मी केदारसोबत केलं होतं. आता सेकंड इनिंगची सुरुवातही केदारमुळे झाली आहे".
सुचित्रा बांदेकर म्हणाल्या,"गॉगल लाऊन महिला घराबाहेर पडल्या की त्या बाईपण भारी देवा' पाहायला जात आहेत, अशी आता परिस्थिती झाली आहे. सिनेमाचं कथानक प्रेक्षकांना भावल्यामुळे त्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे".
'बाईपण भारी देवा' या सिनेमाचे निर्माते निखिल साने म्हणाले की,"केदारने मला गोष्ट ऐकवल्यानंतर मला हा भारतीय सिनेमा वाटला. प्रत्येक सिनेमाची एक वेगळी गोष्ट असते. नागराजने 'सैराट'ची गोष्ट ऐकवली तेव्हा मला आर्ची हे पात्र आवडलं, सुबोधने 'कट्यार' ऐकवला तेव्हा या सिनेमाची बांधणी. आपल्याकडचे वेगवेगळे जॉनर मला भावतात".
'बाईपण भारी देवा'च्या टीमसोबत रंगणार माझा कट्टा
'बाईपण भारी देवा' या सिनेमाच्या टीमसोबत आजचा माझा कट्टा रंगणार आहे. 'बाईपण भारी देवा'च्या शूटिंगदरम्यानचे रंजक किस्से दिग्दर्शक केदार शिंदेसह अभिनेत्री वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगडी, शिल्पा नवलकर सुकन्या मोने, सुचित्रा बांदेकर आणि दीपा परब यांनी माझा कट्ट्यावर शेअर केले आहेत. हा विशेष कट्टा प्रेक्षकांना आज रात्री 8.30 वाजता एबीपी माझावर पाहता येणार आहे.
संबंधित बातम्या