Ravindra Mahajani Death : अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे. पुण्यातील तळेगाव-दाभाडे येथील त्यांच्या राहत्या घरात त्यांचा मृतदेह आढळून आला. रविंद्र महाजनी यांनी वयाच्या 77 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. रविंद्र महाजनी यांच्या निधनानं मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. काही राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीटच्या माध्यमातून रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, आपल्या सर्वांगसुंदर अभिनयाने रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती प्रदान करो तसेच महाजनी परिवारास या दुःखातून सावरण्यासाठी बळ देवो हीच प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.'
तसेच देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्वीट केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं,' ज्येष्ठ अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट सृष्टीतील एक रुबाबदार अभिनेता हरपला आहे. रवींद्र महाजनी यांचे झुंज, मुंबईचा फौजदार, लक्ष्मीची पाऊले यांसारख्या चित्रपटात केलेले काम कायम स्मरणात राहील. रुबाबदार अभिनय आणि देखणे व्यक्तिमत्व यामुळे सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले होते. माझी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली! त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. हे दुःख सहन करण्याची ताकद ईश्वर कुटुंबियांना देवो, हीच प्रार्थना.'
शरद पवार, सुप्रिया सुळे आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देखील ट्विटरवर ट्वीट शेअर करुन रविंद्र महाजनी यांना श्रद्धांजली वाहिली आहेत.
वाचा इतर महत्वाच्या बातम्या: