मुंबई : श्रीदेवी नावाची आख्यायिका संपुष्टात आली आणि बॉलिवूडमधलं एक पर्व संपल्याच्या भावना होऊ लागल्या. श्रीदेवी यांच्या अंतिम क्षणी त्यांची मोठी मुलगी जान्हवी त्यांच्यासोबत नव्हती. त्याहून दुर्दैवाने गोष्ट म्हणजे जान्हवीचा बॉलिवूड डेब्यू असलेला धडक सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वीच आईने जगाचा निरोप घेतला. मात्र कपूर कुटुंबात हे पहिल्यांदा नाही घडलं.


जान्हवीसोबत जे झालं, ते अभिनेता अर्जुन कपूरसोबतही सहा वर्षांपूर्वी झालं होतं. अर्जुन हा श्रीदेवी यांचा सावत्र मुलगा. म्हणजेच बोनी कपूर यांची पहिली पत्नी मोना शौरी यांचा मोठा मुलगा.

11 मे 2012 रोजी अर्जुन कपूरचा 'इशकजादे' हा डेब्यू चित्रपट रिलीज झाला. मात्र तो प्रदर्शित होण्याच्या दोनच महिने अगोदर मोना यांचं निधन झालं. 25 मार्च 2012 रोजी वयाच्या 48 व्या वर्षी मोना यांनी अखेरचा श्वास घेतला.

प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांचं पहिलं लग्न दिल्लीच्या मोना शौरी यांच्यासोबत झालं होतं. मोना आणि बोनी यांना अर्जुन हा मोठा मुलगा, तर अंशुला ही धाकटी कन्या. मात्र अर्जुन 11 वर्षांचा असतानाच हे दाम्पत्य विभक्त झालं.

आई-वडिलांच्या घटस्फोटाचा अर्जुनच्या बालमनावर मोठा आघात झाला. अर्जुनने श्रीदेवीला कधीच आपली आई मानलं नाही. 'मी जेव्हा घरी जातो, तेव्हा आईच्या खोलीत जातो. तिच्या बोलतो. शांत बसतो. आईची इच्छा होती, ते सगळं मी मिळवणार. मी पालकांशिवाय आयुष्यातली 5 वर्ष घालवली आहेत' असं अर्जुन म्हणतो.

श्रीदेवी यांची कन्या जान्हवी करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. मात्र चित्रपट पूर्ण होण्यापूर्वीच या 'मॉम'ने जगाचा निरोप घेतला.

करण जोहरसारखा दिग्दर्शक असल्यामुळे श्रीदेवींनी मोठ्या विश्वासाने त्याची निवड केली. मात्र सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतरही श्रीदेवी लेकीच्या भल्यासाठी वेळोवेळी सूचना करत होत्या.

श्रीदेवी यांना लेकीच्या चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिसून येते. 16 नोव्हेंबर 2017 रोजी धडक सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी ते आपल्या प्रोफाईलला पिन करुन ठेवलं. म्हणजेच श्रीदेवी यांनी कितीही ट्वीट केले, तरी धडकचं पोस्टर सर्वात वर दिसत राहील. मात्र लेकीचा पहिला सिनेमा पाहण्याचं त्यांचं स्वप्न अधुरंच राहिलं.

श्रीदेवी यांना बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार मानलं जातं. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्ल्याळम चित्रपटातही अभिनय केला आहे. गेल्याच वर्षी श्रीदेवी यांच्या चित्रपट कारकीर्दीला 50 वर्ष पूर्ण झाली. 'मॉम' हा त्यांचा तीनशेवा चित्रपट श्रीदेवींच्या हयातीत प्रदर्शित झालेला अखेरचा सिनेमा ठरला. तर झिरो हा त्यांचा कॅमिओ असलेला सिनेमा ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होईल.

श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास यूएईमध्ये निधन झालं. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती. संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.
संबंधित बातम्या:

प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं यूएईमध्ये निधन

म्हणून जान्हवीने तीन दिवस आईशी बोलणं टाकलं

श्रीदेवींचा अखेरचा चित्रपट ऑक्टोबरमध्ये झळकणार

'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द

लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट

दुबईतील लग्नसोहळ्यातले श्रीदेवी यांचे अखेरचे फोटो

बिग बींना श्रीदेवीच्या निधनाची कुणकुण?