मुंबई : बॉलिवूडची 'हवाहवाई' श्रीदेवी यांच्या अकाली मृत्यूमुळे बॉलिवूडसह चाहतावर्ग हळहळत आहे. वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्टचं निमित्त ठरलं आणि श्रीदेवींना मृत्यूने गाठलं. पण याचवेळी नियतीचा अजब खेळ पाहायला मिळाला. लेकीच्या पहिल्या सिनेमाची उत्सुकता श्रीदेवींना लागून राहिली होती, मात्र तो पूर्ण होण्यापूर्वीच या 'मॉम'ने जगाचा निरोप घेतला.


श्रीदेवी यांची कन्या जान्हवी कपूर करण जोहर दिग्दर्शित 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' या चित्रपटाचा हा अधिकृत हिंदी रिमेक आहे. मुलीच्या बॉलिवूड डेब्यूबाबत श्रीदेवी कमालीच्या उत्सुक होत्या. त्याचप्रमाणे मुलीच्या पहिल्या सिनेमाच्या निवडीबाबतही श्रीदेवी चोखंदळ होत्या.

करण जोहरसारखा दिग्दर्शक असल्यामुळे श्रीदेवींनी मोठ्या विश्वासाने त्याची निवड केली. मात्र सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात झाल्यानंतरही श्रीदेवी लेकीच्या भल्यासाठी वेळोवेळी सूचना करत होत्या.

श्रीदेवी यांना लेकीच्या चित्रपटाबद्दल असलेली उत्सुकता त्यांच्या ट्विटर हँडलवरुन दिसून येते. 16 नोव्हेंबर 2017 रोजी धडक सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज झालं आणि गेल्या तीन महिन्यांपासून त्यांनी ते आपल्या प्रोफाईलला पिन करुन ठेवलं. म्हणजेच श्रीदेवी यांनी कितीही ट्वीट केले, तरी धडकचं पोस्टर सर्वात वर दिसत राहील.



धडक सिनेमात जान्हवी कपूर 'आर्ची'च्या तर शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर 'परशा'च्या भूमिकेत दिसणार आहे. करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. धडक 20 जुलै 2018 रोजी प्रदर्शित होणार आहे.

संबंधित बातम्या :


'रुप की रानी' श्रीदेवी यांची कारकीर्द


प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत निधन