दुबईतील स्थानिक वेळेनुसार शनिवारी रात्री 11.30 च्या सुमारास श्रीदेवी यांचं निधन झालं. म्हणजे त्यावेळी भारतात मध्यरात्रीचे एक वाजले होते. मात्र श्रीदेवींच्या निधनाचं वृत्त येईपर्यंत भारतात दोन वाजून गेले होते. अमिताभ बच्चन यांनी सव्वा वाजता ट्वीट करुन 'न जाने क्यूँ, एक अजीब सी घबराहट हो रही है' अशा शब्दात मनातली घालमेल बोलून दाखवली.
अमिताभ बच्चन यांना नेमकी कसली भीती वाटत होती? आपल्या जवळची एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाणार, अशी भीती बिग बींच्या मनात आली होती का? की श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी बिग बींना समजली होती? अशा अनेक प्रश्नांची चर्चा सोशल मीडियावर रंगत आहे.
अमिताभ बच्चन आणि श्रीदेवी यांचा 'खुदा गवाह' (1992) हा सिनेमा चांगलाच गाजला. मात्र त्यापूर्वी दोघांनी इन्कलाब (1984) आणि आखिरी रास्ता (1986) या चित्रपटातही एकत्र भूमिका केली होती. श्रीदेवी यांचं पुनरागमन असलेल्या 'इंग्लिश विंग्लिश' या सिनेमातही अमिताभ बच्चन यांनी छोटीशी भूमिका साकारली होती (विमानातला सहप्रवासी आठवतोय का?)
वयाच्या अवघ्या 54 व्या वर्षी श्रीदेवी यांचं कार्डिअॅक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी यांच्या पश्चात पती बोनी कपूर, मुली खुशी आणि जान्हवी असा परिवार आहे.
संयुक्त अरब अमिरातीतील दुबईपासून 45 मिनिटांवर असलेल्या रास अल खैमामध्ये श्रीदेवी सहकुटुंब गेल्या होत्या. पती बोनी कपूर यांचा भाचा मोहित मारवाहच्या लग्न समारंभासाठी कपूर कुटुंब तिथे गेलं होतं.
शनिवारी रात्री 11-11.30 वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. यावेळी पती बोनी कपूर आणि धाकटी मुलगी खुशी त्यांच्यासोबत दुबईत होते, तर मोठी मुलगी जान्हवी मुंबईत होती.