Baba Siddique Friendship With Bollywood Celebrities : महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठा चेहरा माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी राजकारणातील मातब्बर नेते असण्यासोबत बॉलिवूड सेलिब्रिटींचे खास मित्रही होते. अभिनेता सलमान खानसोबत बाबा सिद्दीकी यांची खास मैत्री होती. सलमान आणि बाबा सिद्दीकी यांना अनेक पार्ट्यांमध्ये एकत्र पाहिलं जायचं. भाईजानचे चांगले मित्र बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी ऐकताच भाईजानला अश्रू अनावर झाले. सिद्दीकींच्या हत्येची बातमी ऐकताच सलमान खानने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी सलमान खानचे डोळे पाणावले होते. आपला मित्र गमावल्याच दु:ख सलमान खानच्या चेहऱ्यावर दिसत होतं.


बाबा सिद्दीकींची गोळ्या झाडून हत्या


राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींसह राजकीय नेत्यांनाही मोठा धक्का बसला आहे. बाबा सिद्दीकी हे बॉलिवूड अभिनेता सलमान खानचे जवळचे मित्र होते. सलमान खासशिवाय बाबा सिद्दीकी यांची शाहरुख खान, संजय दत्त यांच्यासह इतर अनेक बड्या स्टार्सशी मैत्री होती. एवढेच नाही तर सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील तुटलेली मैत्री जोडणारी व्यक्ती बाबा सिद्दीकी होते.


सलमान खानला अश्रू अनावर









बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची बातमी समजताच सलमान खानने लिलावती रुग्णालयाकडेस धाव घेतली. सलमान खानने बिग बॉस 18 चं शूटही रदद् केल्याची बातमी समोर येत आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर दुर्गापुजे दरम्यान गोळीबार करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांना अटक करण्यात आली आहे.


सलमान आणि शाहरुखमधील भांडण मिटवलं


सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील भांडण मिटवण्याचं राम बाबा सिद्दीकी यांनी केले होते. 2008 मध्ये एका पार्टीत सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यात जोरदार भांडण झाले होते. त्यानंतर सलमान आणि शाहरुखची घट्ट मैत्री तुटली होती. दोघांमधील नाराजी इतकी टोकाला पोहोचली होती की, दोघेही एकमेकांच्या कार्यक्रमात जाणे टाळायचे.






बाबा सिद्दीकी त्यांच्या भव्य रोजा इफ्तार पार्टीसाठी प्रसिद्ध होते. बाबा सिद्दीकी यांच्या इफ्तार पार्टीची कायम चर्चा असायची. बाबा सिद्दीकी यांनी 2013 मध्ये इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते, ज्यामध्ये त्यांनी सलमान खान आणि शाहरुख खान दोघांनाही आमंत्रित केले होते. या पार्टीत दोघेही आमनेसामने आले तेव्हा अनेक वर्षांच्या भांडणानंतर सलमान आणि शाहरुख खान यांनी बाबा सिद्दीकीसमोर एकमेकांना मिठी मारली. यानंतर दोघेही सर्व नाराजी विसरून पुन्हा मित्र बनले.