मुंबई: कणखर अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळेपण जपणारी हरहुन्नरी अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. बॉलिवूडची ग्लॅमरस आई म्हणून रीमा लागू परिचीत होत्या.
छातीत दुखू लागल्याने त्यांना काल मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.
रीमा लागू यांनी मराठी, हिंदी चित्रपट आणि नाट्य क्षेत्रात मोठं योगदान दिलं. पूर्वाश्रमीच्या नयन भडभडे लग्नानंतर रीमा लागू या नावाने ओळखल्या जात.
रीमा लागू यांनी सुमारे चार दशकं चित्रपट आणि नाट्य सृष्टी गाजवली. रीमा यांनी अनेक हिंदी चित्रपटांमधून चरित्र अभिनेत्री म्हणून काम केलं आहे.
बॉलीवूडमधील मायाळू आई म्हणूनही त्या परिचीत होत्या. 'कुछ कुछ होता है' मध्ये काजोलची आई, 'हम आपके हैं कौन' मध्ये माधुरी दीक्षितची आई, 'वास्तव'मध्ये संजय दत्तची आई आणि मैने प्यार किया सिनेमात सलमान खानची आई, यासारख्या दमदार भूमिका साकारल्या आहेत.
घरातूनच अभिनयाचे धडे
रीमा लागू यांचा जन्म 1958 मध्ये झाला. घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले. त्यांची आई मंदाकिनी भडभडे यांचं 'लेकुरे उदंड जाहले' हे नाटक प्रचंड गाजलं होतं.
रीमा लागू यांचं पुण्यात शालेय शिक्षण सुरु होतं, त्याचवेळी त्यांना अभिनयाचे धडेही देण्यात आले. माध्यमिक शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाचे व्यावसायिक शिक्षण घेतलं.
त्यानंतर मराठी रंगभूमीवरुन त्यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पाय ठेवला.
विवेक लागू यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर नयन भडभडे या रीमा लागू म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. मात्र काही वर्षानंतर दोघेही वेगवेगळे झाले.
मृण्मयी लागू या रीमा लागू यांच्या कन्या. त्या स्वत:ही नाट्य, सिनेअभिनेत्री आहेत.
रीमा लागू यांचे गाजलेले सिनेमे
मैंने प्यार किया, हम आपके हैं कौन, हम साथ साथ हैं, वास्तव, साजन, कुछ कुछ होता है, आशिकी, कयामत से कयामत तक
हिंदी दूरदर्शन मालिका
श्रीमान श्रीमती, तू तू मैं मैं
मराठी नाटक
घर तिघांचं हवं, चल आटप लवकर, झाले मोकळे आकाश, तो एक क्षण, पुरुष बुलंद, सविता दामोदर परांजपे, विठो रखुमाय