बाहुबली 2 च्या यशामध्ये खारीचा वाटा असलेला एक म्हणजे मनोज गोस्वामी. कधीकाळी सुरतमध्ये हिऱ्याच्या कारखान्यात काम करणाऱ्या मनोजचं बाहुबली कनेक्शन तुम्हाला अचंबित करेल. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे सुरतच्या हिरे कारखान्यात बालमजुरी करणारा मनोज गोस्वामी देशातल्या सर्वात भव्य सिनेमाचा साऊंड डिझायनर झाला आहे.
गुजरातच्या अमरेली जिल्ह्यातून मुंबईत येण्याचा त्याचा प्रवास एका स्वप्नासारखाच आहे. दक्षिणेतला अनगनग हा मनोजचा साऊंड इंजिनिअर म्हणून पहिला सिनेमा. त्यानंतर त्यांनी अनेक हिंदी सिनेमेही केले. सावरिया, कमिने, सात खून माफ, तलाश, हैदर, इश्किया, एक थी डायन याशिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाच्या द रिलक्टंट फंडामेंटलिस्ट सारख्या सिनेमांसाठी मनोजनं साऊंड डिझायनरचं काम केलं.
या सगळ्या चित्रपटांपैकी बाहुबलीचा अनुभव काही वेगळाच होता. अनगनग हा सिनेमा बाहुबलीचे दिग्दर्शक राजामौलींचे गुरु के राघवेंद्र राव यांच्या मुलानं बनवला होता. त्यातील काम राजामौलींना आवडलं आणि मनोज यांना बाहुबलीचं काम मिळालं.
कितीही लपवला तरी खऱ्या हिऱ्याचा प्रकाश लपत नाही असं म्हणतात. मनोजच्या बाबतीतही काहीसं असंच घडलं. हिऱ्याला पॉलिश करणाऱ्या या मुलानं आपल्या कौशल्याच्या जोरावर एक लखलखीत करिअर घडवलं आहे.
‘बाहुबली 2’ म्हणजेच ‘बाहुबली : द कन्क्ल्युजन’ हा चित्रपट 28 एप्रिल 2017 रोजी प्रदर्शित झाला. ‘बाहुबली : द बिगिनिंग’ या 10 जुलै 2015 रोजी प्रदर्शित झालेल्या सिनेमाचा हा सिक्वेल आहे. एस. राजमौली यांनी दोन्ही भागांचं दिग्दर्शन केलं असून प्रभास या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत अनुष्का शेट्टी (देवसेना), रम्या कृष्णन (शिवगामी), राणा डुग्गुबाती (भल्लालदेव), सत्यराज (कटप्पा), तमन्ना भाटिया (अवंतिका) यांच्या भूमिका आहेत. बाहुबली 1 चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही पटकावला होता.