Ayushmann Khurrana Father Passes Away : बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाच्या (Ayushmann Khurrana) वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हृदयविकाराच्या आजाराने ग्रस्त होते. त्यांच्यावर चंडीगढमधील एका रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. वडिलांना निरोप देताना आयुष्मान खुराना आणि अपारशक्ती भावूक झाले होते.
आयुष्मानच्या वडिलांचं नाव पी. खुराणा असं असून ते लोकप्रिय ज्योतिषतज्ञ होते. पंडित पी खुराना हे ज्योतिषशास्त्राच्या क्षेत्रातील त्यांच्या निपुणतेसाठी प्रसिद्ध होते. ज्योतिषशास्त्रासंदर्भातील अनेक पुस्तकेदेखील त्यांनी लिहिली आहेत. ज्योतिषशास्त्रात त्यांचं नाव सन्मानाने घेतलं जायचं.
पी. खुराणा यांच्या निधनाने खुराना कुटुंबावर शोककळा पसरली आहे. काल संध्याकाळी (19 मे 2023) त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. वडिलांच्या निधनाने अभिनेता आयुष्मान आणि अपारशक्ती यांना मोठा धक्का बसला आहे. चाहतेदेखील त्यांच्या निधनावर शोक व्यक्त करत आहेत.
बॉलीवूड अभिनेता अपारशक्ती खुराना यांच्या प्रवक्त्याने अधिकृत निवेदन प्रसिद्ध करून त्यांच्या निधनाची पुष्टी केली. निवेदनात लिहिण्यात आलं आहे की,"आम्हाला सांगायला खूप दु:ख होत आहे की आयुष्मान आणि अपारशक्ती खुराना यांचे वडील, ज्योतिषी पी खुराना यांचे आज सकाळी 10.30 वाजता मोहाली येथे दीर्घ आजाराने निधन झाले. तुमच्या प्रार्थना आणि पाठींब्यासाठी आभारी आहोत".
आयुष्मान खुरानाने अनेकदा आपल्या आई-वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या यशात वडिलांचा मोठा वाटा असल्याचे अभिनेत्याने अनेक मुलाखतींमध्ये सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी आयुष्मानने एक फोटो शेअर करत लिहिलं होतं की,"आम्हाला शिस्त, संगीत, कविता, चित्रपट आणि कलेची गोडी वडिलांमुळेच लागली आहे. त्यांनी कायद्याचा अभ्यास केला पण ज्योतिषशास्त्राबद्दल त्यांना नेहमीच ओढ होती. त्यांनी आम्हाला 'आमच्यात स्वतःचे नशीब लिहिण्याची क्षमता आहे आणि आपलं चांगलं काम कोणत्याही वाईटावर मात करू शकते", असं शिकवलं.
पुरस्कार मिळाल्याचा आनंद वडिलांसोबत शेअर करता येणार नाही...
आयुष्मान खुरानाला 20 मे 2023 रोजी चंदीगड येथे उपराष्ट्रपतींच्या हस्ते कलारत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. पण हा आनंद त्याला त्याच्या वडिलांसोबत शेअर करता येणार नाही. आयुष्मान त्याच्या वडिलांच्या खूप जवळ होता. असे म्हटले जाते की, आयुष्मान लहान असताना एक दिवस तो बॉलिवूडचा मोठा स्टार होईल, असे त्याच्या वडिलांनी म्हटले होते.
पी खुराना यांचा 18 मे ला वाढदिवस होता. पण प्रकृती खालावल्याने आयुष्मानला त्यांचा वाढदिवस साजरा करता आला नाही. अखेर 19 मेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पी खुराना ख्यातनाम ज्योतिषी असून त्यांनी 34 पुस्तके लिहिली आहेत.
संबंधित बातम्या