Atlee Kumar : बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाका करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा अॅटली कुमारने (Atlee Kumar) सांभाळली आहे. अॅटलीचं खरं नाव अरुण असं आहे. दिग्दर्शक असण्यासोबत तो पटकथा लेखक आणि निर्माताही आहे. दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शकांमध्ये अॅटलीची गणना होते. 


अॅटली कुमारने सिनेसृष्टीत पदार्पण केल्यानंतर दिग्दर्शक शंकर यांच्या 'राजा राणी' सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं. अॅटलीने आजवर थरार आणि अॅक्शन असलेले अनेक सिनेमे बनवले आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी त्याचा सिनेमा पाहणं म्हणजे मनोरंजनाची मेजवानी असते. थरारक आणि रोमांचक सिनेमे बनवण्यावर अॅटलीचा भर आहे. 


अॅटली कुमारचा सिनेप्रवास जाणून घ्या... (Atlee Kumar Movies)


अॅटलीने वयाच्या 19 व्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. कारकीर्द मोठी नसली तरी अल्पावधीतच त्याला चांगलच यश मिळालं आहे. दहा वर्षांच्या सिनेप्रवासात त्याने पाच सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. त्याचे पाचही सिनेमे बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरले. त्यामुळे अॅटलीची गणना तामिळ सिनेसृष्टीतील महान दिग्दर्शकांमध्ये केली जाते. 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून अॅटलीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.


अॅटली कुमार तीन वर्षांपूर्वी प्रसिद्धीझोतात आला होता. त्यावेळी त्यांच्या रंगावरुन लोकांनी त्याला हिणवलं. नेटकऱ्यांनी प्रचंड ट्रोल केलं. 2019 मध्ये अॅटली किंग खानसोबत आयपीएल सामना पाहायला गेला होता. कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सामना होता. त्यावेळी अॅटली आणि शाहरुखला पहिल्यांदा एकत्र स्पॉट करण्यात आले होते.


अॅटली कुमारने 2019 मध्ये सिनेनिर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवलं. पत्नी प्रियासह त्याने 'ए फॉर अॅपल' या निर्मिती संस्थेची स्थापना केली. 'सांगिली बंगिली कधवा थोराए' हा त्यांनी निर्मिती केलेला पहिला सिनेमा आहे. त्यानंतर त्यांनी 'अंधघरम' या दुसऱ्या सिनेमाची निर्मिती केली. आता 'जवान' या सिनेमाच्या माध्यमातून त्याने हिंदी सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. त्याच्या या पहिल्याच सिनेमात शाहरुख खान, नयनतारा, विजय सेतुपती, प्रियामणी, सान्या मल्होत्रा, दीपिका पदुकोण आणि संजय दत्त अशी तगडी स्टारकास्ट आहे. 


'जवान' या सिनेमानंतर अॅटली कुमार वरुण धवनसोबत सिनेमा करणार असल्याचं म्हटलं जात आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती अॅटली कुमार करणार आहे. जून महिन्यात या सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. अॅटली कुमार हा भारतीय सिनेसृष्टीतील युवा दिग्दर्शक आहे. तामिळनाडूत जन्मलेल्या अॅटली कुमारने अल्पावधीतच जगभरात स्वत:ला सिद्ध केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, अॅटली कुमार एका सिनेमासाठी 52 कोटी रुपये मानधन घेतो. 'जवान' या ब्लॉकबस्टर सिनेमासाठी त्याने 30 कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे. 


संबंधित बातम्या


Atlee Kumar : 'जवान' रिलीज झाला अन् चर्चा शाहरुखपेक्षा ॲटली कुमारची; दिग्दर्शकाच्या पत्नीसमोर अभिनेत्रीही पडल्या फिक्या