Satyajit Ray Memorical Awards Winner Ashok Rane : सिने-समीक्षक अशोक राणे (Ashok Rane) यांना यंदाचा 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' (Satyajit Ray Memorical Awards 2023) जाहीर झाला आहे. सिनेसृष्टीतील लेखनासाठी तसेच चित्रपट समीक्षा लेखन क्षेत्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केल्याबद्दल अशोक राणे यांना 'सत्यजित रे स्मृती पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात येणार आहे.
अशोक राणे हे गेल्या 46 वर्षांपासून सिनेमासंदर्भात लेखन करत आहेत. आजवर त्यांना त्यांच्या लेखनासाठी तीन वेळा राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे. गेली 46 वर्षे मराठीतील सर्व वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधून सातत्याने चित्रपट समीक्षा लेखन करत आलेले अशोक राणे हे हा पुरस्कार प्राप्त करणारे पहिलेच मराठी चित्रपट समीक्षक आहेत. मराठी भाषेतून जागतिक सिनेमावर त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केलं आहे. तसेच इंग्रजीतूनही त्यांनी लेखन केलं आहे. गेल्या काही दिवसांत चित्रपट समीक्षा लेखनाच्या क्षेत्रात त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा निर्माण केला आहे.
सत्यजित रे स्मृती पुरस्कारासह राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त करणारे अशोक राणे हे मराठी मनोरंजनसृष्टीतील पहिले चित्रपट समीक्षक आहेत. सिनेमासंदर्भातलं उत्तमोत्तम लेखन करणाऱ्या लेखकाला 'सत्यजित रे स्मृती पुरस्कार' दिला जातो. याआधी अरुणा वासूदेव (2021) आणि प्रो. शनमुगदास (2022) यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.
अशोक राणे यांची साहित्य संपदा
'सिनेमाची चित्रकथा' (1995), 'चित्र मनातले' (1996), 'अनुभव' (1997), 'चित्रपट एक प्रवास' (2001), 'सख्ये सोबती' (2003), 'व्ह्यूस अॅन्ड थॉट्स ऑन स्क्रीप्ट रायटींग' (2006), 'मोन्ताज' (2015), आणि 'सिनेमा पाहणारा माणूस' (2019) अशी अशोक राणे यांची साहित्य संपदा आहे.
अशोक राणे यांना पहिल्यांदा 1995 साली 'सिनेमाची चित्रकथा' या पुस्तकाच्या लेखनासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर 2003 साली सर्वोत्कृष्ठ सिने-समीक्षक म्हणून आणि 'सिनेमा पाहणारा माणूस' या त्यांच्या आत्मचरीत्रात्मक पुस्तकासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तीन वेळा राष्ट्रीय पातळीवर अशोक राणे यांचा गौरव झाला आहे.
अशोक राणे यांच्याबद्दल जाणून घ्या... (Who Is Ashok Rane)
अशोक राणे यांनी आजवर एकूण 8 माहितीपट केले आहेत. या माहितीपटांसाठी त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळाले आहेत. सिनेमा सोप्या भाषेत सर्व महाराष्ट्राला समजला पाहिजे यासाठी महाराष्ट्रातल्या 25 शहरांमध्ये स्वखर्चाने ते सिनेमाची कार्यशाळा घेत आहेत. आजही ही कार्यशाळा सुरू आहे.
संबंधित बातम्या