Majrooh Sultanpuri Deth Anniversary: हिंदी चित्रपटांचे प्रसिद्ध गीतकार आणि कवी मजरूह सुल्तानपुरी हे 'हमे तुमसे प्यार कितना', 'एक लडकी भीगी भागी सी', 'ओ मेरे दिल के चैन', 'चुरा लिया है तुमने जो दिल को' यांसारख्या सदाबहार गाण्यांचे गीतकार आहेत. सुल्तानपुरी यांनी चित्रपट गीतकार म्हणून खूप प्रसिद्धी आणि नाव कमावले. गीतकार असण्याबरोबरच ते उत्तम गझलकारही होते. आज मजरूह सुल्तानपुरी यांची 22 वी पुण्यतिथी आहे. या निमित्ताने जाणून घेऊ त्यांच्या आयुष्यातील काही रंजक गोष्टी...


हिंदी चित्रपटांसाठी अनेक अविस्मरणीय गाणी लिहिणाऱ्या मजरूह सुल्तानपुरी यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे झाला. यावरूनच त्यांनी आपलं आडनाव म्हणून आपले जन्मस्थान 'सुलतानपुरी' जोडले. मजरूह सुल्तानपुरी यांचे खरे नाव असरुल हक खान होते. वडिलांच्या सांगण्यावरून त्यांनी आयुर्वेद आणि युनानी पद्धतीचा अभ्यास केला. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच होतं, त्यांनी स्वतःला पूर्णपणे लेखणीत बुडून घेतलं होत. असरुल यांनी पुढे स्वतःसाठी नवीन नावाची निवड केली. त्यांनी स्वतःला मजरूह हे नाव दिले. ज्याचा अर्थ जखमी असा आहे. 


असा सुरू झाला चित्रपटात गाणी लिहिण्याचा प्रवास 
 
मुंबईत 1945 साली झालेल्या मुशायराच्या वेळी चित्रपट निर्माते ए.आर. कारदार यांनी त्यांचे लक्ष वेधून घेतले आणि त्यांना चित्रपटात लेखन करण्यास राजी केले. यानंतर मजरूह यांनी 1946 मध्ये त्यांच्या ‘शाहजहाँ’ चित्रपटासाठी गाणी लिहिली. येथून त्यांनी बॉलिवूड चित्रपटांसाठी गाणी लिहिण्यास सुरुवात केली.


मजरूह यांचा एक प्रसिद्ध शेर


‘मैं अकेला ही चला था जानिबे मंजिल मगर,
लोग साथ आते गए और कारवां बनता गया।’


सुल्तानपुरी यांची कविता ऐकून नेहरू सरकार भडकले
  
मुंबईत 1949 साली एका कामगार संपात मजरूह सुल्तानपुरी यांनी अशी कविता ऐकवली की नेहरू सरकार भडकले. तत्कालीन गव्हर्नर मोरारजी देसाई यांनी मजरूह सुल्तानपुरी यांना आर्थर रोड तुरुंगात टाकले. मजरूह सुल्तानपुरी यांना त्यांच्या कवितेबद्दल माफी मागण्यास सांगितले, पण त्यांनी नकार दिला. त्यामुळे मजरूह सुल्तानपुरी यांना दोन वर्षे तुरुंगात राहावे लागले.


ही होती ती कविता..
 
मन में ज़हर डॉलर के बसा के,
फिरती है भारत की अहिंसा।
खादी की केंचुल को पहनकर,
ये केंचुल लहराने न पाए।
ये भी है हिटलर का चेला,
मार लो साथी जाने न पाए।
कॉमनवेल्थ का दास है नेहरू,
मार लो साथी जाने न पाए।


तुरुंगातही लिहीत होते गीत 


शिक्षेदरम्यान मजरूह यांना मुलगी झाली. कुटुंब आर्थिक संकटातून जाऊ लागले. त्यामुळे मजरूह साहब यांनी तुरुंगातूनच काही चित्रपटांसाठी गाणी लिहायला सुरुवात केली. मजरूह 1951-52 या काळात तुरुंगातून बाहेर आले आणि तेव्हापासून 2000 सालापर्यंत त्यांनी चित्रपट गीते लिहिणे सुरूच ठेवले. 24 मे 2000 रोजी मुंबईत त्यांचे निधन झाले.