Arjun Kapoor :  अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) आगामी 'सिंघम' या चित्रपटातील खलनायकी भूमिकेमुळे चर्चेत आहे. नुकताच या चित्रपटातील अर्जुनचा लूक सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला. त्यात त्याचा रक्ताने माखलेला चेहरा आणि खुंखार अवताराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अर्जुनच्या या लूकची जोरदार चर्चा  झाली. अर्जुनने आता आपल्या भूमिकेबद्दल भाष्य केले. 


अर्जुन कपूरने म्हटले की, दिग्दर्शकाला माझ्यासाठी एखादी भूमिका वाटत असेल तर ती विशिष्ट भूमिका न करण्याबद्दल मनात प्रश्नच निर्माण होत नाही. माझं चित्रपटांवर प्रेम असून विविध भूमिका साकारण्याचा प्रयोग करण्याची इच्छा असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले. 


अभिनेता होण्याबाबत कधी विचार केला नव्हता...


अर्जुन कपूरने म्हटले की, मी कधी अभिनेता होण्याबाबत विचार केला नव्हता. मात्र, मला चित्रपटांबद्दल प्रेम निर्माण झाले. मी खूप चित्रपट पाहिले. सिनेइंडस्ट्रीतील लोक देशातील नागरिकांचे मनोरंजन करण्यासाठी समर्पित भावनने काम करतात आणि त्यांना आनंद वाटण्यासाठी प्रयत्न करतात याचा आनंद आणि समाधान वाटत असल्याचेही अर्जुन कपूरने म्हटले. 


चांगले काम करण्यासाठी खूप मेहनत करायची होती


अर्जुन कपूरने सांगितले की,'मला जेव्हा अभिनयाविषयी जाणून घ्यायचे होते तेव्हा मला फक्त अभिनय करून कॅमेराचा सामना करायचा होता. पडद्यावर कोणत्या भूमिकेसाठी माझी निवड झाली यावर माझे लक्ष नव्हते. अभिनेत्यांना शॉट देताना जो जोश आणि आनंद मला अनुभवायचा होता. चांगले काम करण्यासाठी खूप मेहनत करायची होती असेही त्याने म्हटले. 






पडद्यावर नायक म्हणून काम करण्याची माझ्यात धग...


अर्जुनने असेही सांगितले की, 'इश्कजादे'मध्ये मुख्य भूमिकेसाठी त्याची ऑडिशन घेतली जात आहे हे मला माहीत नव्हते. तो म्हणाला, 'मुख्य भूमिकेत लाँच होणे हे देखील घडले कारण आदित्य चोप्राने पाहिले की पडद्यावर नायक म्हणून काम करण्याची माझ्यात धग आहे. 


इश्कजादे या चित्रपटातील मुख्य भूमिकेसाठी माझी ऑडिशन घेतली जात आहे हे जाणून मी कधीच ऑडिशन दिले नाही. ही भूमिका मिळाल्यावर मी भारावून गेलो. मला तो दिवस अजूनही आठवतो, कदाचित तो माझ्या आयुष्यातील सर्वात आनंदी दिवसांपैकी एक होता असेही अर्जुन कपूरने म्हटले. 


रोहित शेट्टीला माझ्यात खलनायक दिसला... 


अर्जुन कपूरने म्हटले की, मला संधी देणाऱ्या सगळ्या दिग्दर्शकांचे आणि निर्मात्यांचा आभारी आहे. त्यांनी रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी दिली. रोहित शेट्टी सारख्या दिग्गज फिल्ममेकरला त्याच्या सिंघम अगेनसाठीचा खलनायक माझ्यात दिसला. चित्रपट रिलीज झाल्यावर माझ्या कामावर प्रेक्षक काय प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता असल्याचे अर्जुन कपूरने म्हटले.