Madhuri Dixit: बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अशी ओळख असणाऱ्या माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) हिंदी चित्रपटसृष्टीत विशेष स्थान निर्माण केलं आहे. कधी 'मोहिनी' तर कधी चंद्रमुखी होऊन माधुरीने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. माधुरी ही केवळ तिच्या अभिनयानं नाही तर नृत्यानं देखील प्रेक्षकांची मनं जिंकते. आता माधुरीला तिच्या अभिनयासाठी एका खास पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले. याबाबत अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ट्वीट शेअर करुन माहिती दिली आहे.
अनुराग ठाकूर यांचे ट्वीट
माधुरी दीक्षितला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया (IFFI) मध्ये 'स्पेशल रिकग्निशन फॉर कॉन्ट्रिब्युशन टू भारतीय सिनेमा' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याबाबत नुकतेच अनुराग ठाकूर यांनी ट्वीट शेअर केलं आहे. त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं, माधुरी दीक्षितनं चार अविश्वसनीय दशकांपासून अतुलनीय प्रतिभेने पडद्यावर शोभा वाढवली आहे. तेजस्वी निशा ते मनमोहक चंद्रमुखी, भव्य बेगम पारा ते अदम्य रज्जो पर्यंत, तिच्या अष्टपैलुत्वाला सीमा नाहीत.
"आज, 54 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात, चित्रपटसृष्टीतील उत्कृष्टतेची व्याख्या करणाऱ्या प्रतिभावान, करिष्माई अभिनेत्रीला 'स्पेशल रिकग्निशन फॉर कॉन्ट्रिब्युशन टू भारतीय सिनेमा' हा पुरस्कार प्रदान करताना आम्हाला खूप आनंद होत आहे.हा एका विलक्षण प्रवासाचा उत्सव आहे.", असंही अनुराग ठाकूर यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (IFFI) गोव्यात पार पडत आहे. आज (20 नोव्हेंबर) श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये 9 या महोत्सवाचं उद्धाटन झालं. हा महोत्सव नऊ दिवस असणार आहे.
माधुरीचे चित्रपट
बेटा , खलनायक, हम आप के है कौन,दिल तो पागल है या माधुरीच्या चित्रपटांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. काही महिन्यांपूर्वी माधुरीची द फेम गेम ही वेब सीरिज झाली. आता माधुरीचा 'पंचक' हा चित्रपट रिलीज होणार आहे. या चित्रपटची निर्मिती माधुरी करणार आहे. माधुरीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात.
संबंधित बातम्या:
Mahesh Manjrekar : 'IFFI' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात महेश मांजरेकरांच्या 'बटरफ्लाय'चा विशेष शो