कंगना आणि राजकुमार राव यांची मुख्य भूमिका असलेल्या 'जजमेंटल है क्या' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. या ट्रेलरचं भरभरुन कौतुक तापसीने ट्विटरवरुन केलं. 'हा ट्रेलर खूप मस्त आहे. याच्याकडून भरपूर अपेक्षा होत्या आणि त्याची पूर्तता हाईल असं वाटतं' अशा आशयाचं ट्वीट तापसीने केलं.
तापसीचं ट्वीट वाचून रंगोलीचा तीळपापड झाला. 'काही जण कंगनाची कॉपी करुन आपलं दुकान चालवतात. पण एक गोष्ट ध्यानात घ्या. ट्रेलरचं कौतुक करताना तिचा साधा उल्लेखही केला नाही. कंगनाला 'डबल फिल्टर'ची गरज आहे, असं तापसीजी म्हणाल्याचं मी मागे ऐकलं. पण तापसी, तू तिची भ्रष्ट नक्कल करणं बंद कर' अशा शब्दात रंगोलीने तापसीला लक्ष्य केलं.
रंगोलीचा थयथयाट पाहून दिग्दर्शक अनुराग कश्यप तापसीच्या मदतीला धावून आले. 'कम ऑन रंगोली. हे फारच होतंय. ही कसली अधीरता. मला खरंच कळत नाही, काय बोलावं. तुझी बहीण आणि तापसी अशा दोघींसोबत मी काम केलं आहे. पण मला तुझं म्हणणं कळतच नाही. ट्रेलरचं कौतुक म्हणजे त्यातील प्रत्येक घटकाचं कौतुक. यात कंगनाचा समावेश होतो.' असं म्हणत कश्यप यांनी रंगोलीला समजावण्याचा प्रयत्न केला.
रंगोली यावर शांत बसणारी नाही. 'तापसी कायम कंगनाला टोकाच्या भूमिकेबद्दल बोलत आली आहे' याकडे रंगोलीने लक्ष वेधलं. एकामागोमाग एक असे चार ट्वीट्स करत तापसीसह अनेकांवर तिने टीकास्त्र सोडलं. 'सगळे जण कंगनाचे चाहते आहेत आणि सगळ्यांना कंगनाला कॉपी करायला आवडतं. मात्र सर्वांचा शहाणपणा बाहेर काढायला मी आले आहे. सर्वांची पोलखोल करेन. कोणीही वाचणार नाही.' असा इशाराही तिने दिला.
त्याच वेळी कंगनाने 'स्पॉटबॉय' या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत आपली बहीण रंगोली आपल्या रक्षणासाठी झगडत असल्याची प्रतिक्रिया दिली.