Anupam Kher on Aamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खानचा (Aamir Khan) 'लाल सिंह चड्ढा' (Laal Singh Chaddha)  हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवू शकलेला नाही. बनल्यापासून ते प्रदर्शित होईपर्यंत या चित्रपटाला बॉयकॉटच्या ट्रेंडला सामोरे जावे लागले. याला कारणीभूत आमिरने केलेली काही वक्तव्ये होती. देशात असहिष्णुता वाढत असल्याचे आमिरच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर चांगलाच गदारोळ माजला होता. तेव्हापासून सोशल मीडियावर आमिरविरोधात संताप पाहायला मिळत आहे. त्यातच त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाला बॉयकॉट ट्रेंडचा सामना करावा लागला आहे. यावर आता अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.


आता आमिर खानच्या या चित्रपटाच्या फ्लॉप होण्याबाबत अनुपम खेर यांची प्रतिक्रिया समोर आली असून, त्यात त्यांनी अभिनेत्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. अनुपम खेर यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बॉयकॉट ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली. आमिर खानचे वक्तव्य यामागचे कारण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


नंतरचे परिणाम नक्कीच त्रासदायक असतील!


अनुपम खेर यांनी आमिरसोबत 'ऐ दिल है की मानता नहीं' आणि 'दिल' या चित्रपटात काम केले आहे. अनुपम खेर यांनी 'लाल सिंह चड्ढा'च्या बॉयकॉट ट्रेंडसाठी आमिरला जबाबदार धरले आहे. अनुपम खेर म्हणाले, 'जर कुणाला वाटत असेल की, त्यांनी ट्रेंड सुरू करावा, तर ते तसे करण्यास मोकळे आहेत. ट्विटरवर रोज नवनवीन ट्रेंड येत असतात. पण जर तुम्ही काही वक्तव्ये केली असतील, तर त्याचे परिणाम नंतर नक्कीच त्रासदायक असतील.’


बॉलिवूड चित्रपटांवर सध्या बॉयकॉट ट्रेंडचे सावट आहे. पुढच्या वर्षी प्रदर्शित होणार्‍या चित्रपटांनाही आतापासून विरोध सुरू झाला आहे. 'लाल सिंह चड्ढा'सोबतच अक्षय कुमारच्या 'रक्षा बंधन'वरही बॉयकॉटचा ट्रेंड चालवला गेला. याशिवाय 'लायगर', 'पठाण' आणि 'ब्रह्मास्त्र' यांनाही सोशल मीडियावरील ‘बॉयकॉट’ ट्रेंडला सामोरे जावे लागत आहे.


... म्हणून सुरु झाली बॉयकॉट मोहीम!


जवळपास चार वर्षानंतर आमिर खान ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. हा चित्रपट हॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘फॉरेस्ट गंप’चा अधिकृत हिंदी रिमेक आहे. प्रख्यात अभिनेता अतुल कुलकर्णीने याचे हिंदी रुपांतर केले होते. आमिरने या चित्रपटाच्या रिमेकचे अधिकार मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले. जवळ जवळ आठ वर्ष त्याचे प्रयत्न सुरु होते, असे म्हटले जाते. ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’ प्रदर्शित झाल्यानंतर आमिरने ‘लाल सिंह चड्ढा’च्या शूटिंगला सुरुवात केली होती. खरं तर 2020 मध्येच हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार होता. पण कोरोनामुळे चित्रपटाचे प्रदर्शन लांबले. आमिरचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर उत्पन्नाचे विक्रम करेल असे म्हटले जात होते. त्यातच आमिरची आणि त्याची पूर्वाश्रमीची पत्नी किरण राव यांचे वक्तव्य, करीना कपूरने प्रेक्षकांबाबत केलेले वक्तव्य यामुळे देशभरात सोशल मीडियावर ‘लाल सिंह चड्ढा’ बॉयकॉट करण्याची मोहीम सुरु झाली आणि चित्रपट प्रदर्शित होताच फ्लॉप ठरला.


वाचा इतर महत्त्वाच्या बातम्या: