Anubhav Sinha : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या नवव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'तुम बिन', 'थप्पड', 'मुल्क', 'आर्टिकल 15', 'कॅश', 'रावण' या चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांच्याशी युवा दिग्दर्शक जयप्रद देसाई यांनी मास्टर क्लासमध्ये संवाद साधला.
अनुभव सिन्हा म्हणाले की, ‘आर्टिकल 15’ ची कथा मी जेंव्हा माझ्या कार्यालयातील लोकांना ऐकवली तेंव्हा त्यांना ही गोष्ट सध्याची वाटली नाही. आता कुठे अशा घटना घडतात का? असा प्रश्न त्यांनी मला विचारला. त्याचवेळी मला असे वाटले की, आता तर हा चित्रपट बनलाच पाहिजे. या चित्रपटाच्या यशामध्ये खूप लोकांचे योगदान असून याचे मला क्रेडिट मिळत असते.
चित्रपटसृष्टीत मी तीन दशके काम करूनही लोकं मला दिग्दर्शक म्हणून कमी आणि टेक्निशियन म्हणून अधिक ओळखायचे. मात्र, 'मुल्क' आणि ‘आर्टिकल 15’ पासून मला ‘दिग्दर्शक’ म्हणून ओळख मिळाली आणि जेंव्हा आपल्याकडे यश असते तेव्हा आपल्याला कोणीही प्रश्न विचारत नाही, असे प्रतिपादन सिन्हा यांनी यावेळी केले.
आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांच्याशिवाय आपले काही काम होत नाही. अशीच काही लोक, अभिनेते माझ्या आयुष्यात आहेत, जे माझ्यासाठी काम करतात. मी एखाद्या चित्रपटाची संहिता लिहितानाच ही लोक माझ्या नजरेसमोर येत जातात आणि ते कधी त्या विशिष्ट चित्रपटाचा भाग बनून जातात हे समजत नाही, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.
सिन्हा पुढे म्हणाले, माझे 12 वी पर्यंतचे शिक्षण बनारस येथे झाले. त्यानंतर अभियांत्रिकीचे शिक्षण अलिगढ येथे झाले. माझी आवड संगीत, समाज, धर्मनिरपेक्षता, समाजातील विविधतेकडे होती. रक्ताची भीती वाटते म्हणून मी डॉक्टर न होता अभियंता झालो. अभियंता झाल्यास मी एक वर्ष नोकरी केली, मात्र नोकरी करीत असताना मला जाणवले की, हे तर आपल्याला करायचे नाही. आणि कसलाही विचार न करता मी नोकरी सोडली. एक वर्ष मी मला काय करायचे आहे; याच्या शोधात होतो. माझ्या मित्राचे मोठे भाऊ एक माहितीपट बनवत होते. या माहितीपटासाठी मी सहायक म्हणून कामाला गेलो आणि पहिल्याच दिवशी मला जाणवले की, हेच आहे जे आपल्याला करायचे आहे. त्यानंतर 4 डिसेंबर 1990 मध्ये मुंबईला आलो आणि तिथून पुढे माझा प्रवास सुरू झाला. ‘शिकस्त’ हा दूर चित्रवाणीवरील माझा पहिला शो होता".
माझ्याबद्दल चित्रपटसृष्टीतील काही मंडळींकडून उपाहासाने असे बोलले जाते की, हा खूप बुद्धिमान राजकीय चित्रपट बनवतो. हा अल्पकाळापुरता या क्षेत्रात राहणार असून याचे काही महत्व नाही. चित्रपटसृष्टी ही एक दंतकथा असून अशी काही गोष्ट अस्तित्वात नाही. इथे कोणी कोणासाठी उभं राहताना दिसत नाही. 2011 - 2017 मध्ये मी दिग्दर्शक आहे की, नाही असे मला वाटत होते. नवीन चित्रपट काढण्याची हिंमत नव्हती. ‘थप्पड' हा माझा आवडता चित्रपट असून 'मुल्क' चित्रपटाने मला दिग्दर्शक म्हणून ओळख दिली.
प्रेमचंद, महादेवी वर्मा, जयशंकर प्रसाद, नागार्जुन, विजय तेंडुलकर हे आजच्या तरुणाईला माहिती नाही. त्यांनी या महान लोकांना वाचले नसून त्यांनी संगीतही एकलेले नाही. खूप सारी दिशाभूल करणारी माहिती घेऊन त्यावर ते विश्वास ठेवत आहेत. भाषेचा कोणताही धर्म नसतो आणि या देशातील भाषा आपण शिकायला हव्यात. आजच्या तरुणाईला केवळ रिल्स पहायच्या आहेत. कबीर, रहीम, रवींद्रनाथ टागोर या महान लोकांबद्दल माहितीच नाही. रामायण कधी वाचले नाही, त्याबद्दल काही माहिती नाही आणि त्यावर तरुण व्यक्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. विशेषत: आजचा तरुण खूप उथळपणे प्रत्येक गोष्टीला स्पर्श करून पुढे जाताना दिसत आहे. भारताची संस्कृती, कला, साहित्य याबद्दल त्यांना माहिती नसून त्यांनी हे जाणून घेतले पाहिजे, असेही सिन्हा यावेळी म्हणाले.
मी माझ्या देशावर मनापासून प्रेम करतो : अनुभव सिन्हा
अनुभव सिन्हा पुढे म्हणाले,"मी माझ्या देशावर मनापासून प्रेम करतो. प्रेम म्हणजे एखाद्याबद्दल केवळ चांगले बोलणेच नसते. आपल्या आईवर आपले प्रेम असते तरी आपण तिच्या चुकीच्या गोष्टीबद्दल बोलतोच की! याचा अर्थ आपले आपल्या आईवरील प्रेम कमी झाले का? नाही ना! घरातील वडील, बहीण, भाऊ, दोस्त आणि देशावरही आपण टीका करू! शेवटी, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने काम करताहेत आणि या सगळ्या प्रकारच्या मते असणाऱ्या लोकांनी समाज बनतो".
संबंधित बातम्या