मुंबई : मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणारी अभिनेत्री कंगना रनौतच्या अडचणी वाढण्याची चिन्हं आहेत. एखाद्या समाजाबद्दल सोशल मीडियावर द्वेषपूर्ण व अवमानकारक पोस्ट केल्याप्रकरणी कंगना व तिची बहीण रंगोली चंडेल या दोघींची चौकशी करा,असे आदेश मुंबई महानगर दंडाधिकारी कोर्टानं गुरूवारी मुंबई पोलिसांना दिले आहेत. एवढेच नव्हे तर चौकशीचा प्राथमिक अहवाल 5 डिसेंबरपर्यंत कोर्टात सादर करा,असेही न्यायाधीश भागवत झिरपे यांनी पोलिसांना बजावले आहे.


काही दिवसांपूर्वी तबलिगी समाजाबद्दल कंगनाची बहीण रंगोली हिनं द्वेषयुक्त व अपमानकारक ट्विट केले होते. याविरोधात अॅड. अली काशिफ खान देशमुख यांनी आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. याप्रकरणात मुंबई पोलिसांनी केवळ सोशल मीडियावरील तिची सेवा खंडित केली व त्या व्यतिरिक्त तिच्यावर काहीच कारवाई केली नाही. याप्रकरणी आपल्या बहिणीला पाठिंबा दर्शवत कंगनाने एक व्हिडिओ ट्विटरवर अपलोड केला होता, ज्यात तिनं रंगोलीचं समर्थन केलं होतं. याविरोधात अॅड. देशमुख यांनी मॅजिस्ट्रेट कोर्टात तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत या प्रकरणातील पुरावे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असल्याने पुढील कारवाईसाठी चौकशी होणं आवश्यक असल्याचे कोर्टाने स्पष्ट केलं. तसेच संबंधित व्यक्तीची या प्रकरणात नेमकी भूमिका काय होती?, हे कळणं गरजेचं असल्यानं याबाबतचा चौकशी अहवाल दिलेल्या मुदतीत पोलिसांनी सादर करावा असा आदेश न्यायाधीशांनी दिला आहे.


बहिणीच्या वादग्रस्त ट्विटनंतर कंगनाचा आक्षेपार्ह व्हिडीओ; मुंबईत तक्रार दाखल


रंगोलीचं वादग्रस्त ट्विट
काही दिवासांपूर्वी उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद शहरातील एका वस्तीमध्ये कोरोना विषाणूची चाचणी घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर लोकांनी दगडफेक केल्याचा प्रकार घडला होता. या हल्ल्यात अनेक आरोग्य कर्मचारी जखमी झाले. या घटनेनंतर कंगनाची बहिणी आणि व्यवस्थापक गंगोली हिने अत्यंत आक्षेपार्ह ट्विट करत विशिष्ट समाजाला लक्ष्य केलं होतं. या हल्लेखोर लोकांना तिने 'दहशतवादी' संबोधले होते. यावरचं न थांबता अशा हल्लेखोरांना गोळ्या घालण्याची भाषा केली होती. रंगोली हिच्या या ट्विटमुळे वातावरण खूपचं तापलं. त्यामुळे ट्विटरने तिचं अकाउंट सस्पेंड केलं.


रंगोलीचं कंगनाकडून समर्थन
रंगालीच्या या वादग्रस्त ट्विटनंतर कंगनाने बहिणीच्या समर्थनार्थ एक व्हिडीओ जारी केला. ज्यात तिने रंगोलीच्या सर्व वक्तव्यांचं समर्थन केलं. या व्हिडीओमुळे आता कंगनाही अडचणीत आली आहे. विशेष म्हणजे मागच्याच आठवड्यात वकील अली काशिफ खान यांनी रंगोली हिच्या विरोधात आंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.