मुंबई : राजकीय भूमिका घेतल्याने स्टार प्रवाह वरील लोकप्रिय मालिका ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून अभिनेता किरण माने (Kiran Mane) यांना काढल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ अनेक जण बोलू लागले आहेत. काल राष्ट्रवादी काँग्रेसने किरण माने यांची बाजू घेतली होती. आता माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेतील मुख्य अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) यांनी कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे हे चुकीचे असल्याचे सांगत किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे. 


अनिता दाते यांनी आपल्या फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. दाते यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "कोणत्याही अभिनेत्याला/अभिनेत्रीला आगाऊ कल्पना न देता अथवा कोणतीही समज न देता अथवा कोणतेही कारण न देता कामावरून बाजूला करणे चुकीचे आहे. अशा निर्मिती संस्था आणि चॅनलने त्या कलाकाराला कामावरून काढण्याचे योग्य कारण देण्याचे सौजन्य दाखवले पाहिजे. अशा व्यवस्थांचा मी निषेध करते, असे दाते यांनी म्हटले आहे.


"व्यवस्था समजून घेणे, व्यवस्थेला प्रश्न विचारणे, आपली राजकीय भूमिका योग्य पद्धतीने मांडता येणे ही खरंतर चांगली गोष्ट आहे, असंच मी मानते. त्याबाबत किरण माने यांचे कौतुक आहे. एखाद्या व्यक्तीची पोस्ट समजून घेण्याऐवजी त्याची गळचेपी करणे हे चुकीचे आहे. आपली राजकीय भूमिका वेगळी असेल तर आपण त्या व्यक्तीशी वाद घालू शकतो. चर्चा करू शकतो. मात्र, त्याचं तोंड बंद करणे, त्याला धमकावणे, त्याच्या व्यवसायावर, कामावर टाच आणणे हे समाज म्हणून आपण निर्बुद्ध व मागास असल्याचे लक्षण आहे" असे अनिता दाते  यांनी म्हटले आहे. 



एका मुलाखतीमध्ये किरण यांनी सांगितले होते की, माझ्या राजकीय भूमिकेमुळे मला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आलं आहे. त्यानंतर किरण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, ' काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा... गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा !' किरण माने यांच्या अनेक चाहत्यांनी आयस्टँड व्हिथ किरण माने असा हॅशटॅग वापरून किरण माने यांना पाठिंबा दर्शवला आहे.


महत्वाच्या बातम्या


कलाकारांची मुस्कटदाबी खपवून घेतली जाणार नाही; किरण माने यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी काँग्रेस मैदानात