Anant Ambani-Radhika Merchant Wedding : देशातील आघाडीचे उद्योजक आणि रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानींच्या (Anant Ambani) विवाह सोहळ्यात राजकीय मंडळी उपस्थित राहणार आहेत. अनंत अंबानी-राधिका  मर्चंटच्या लग्नसोहळ्यात (Anant Ambani-Radhika Merchant Wedding) विविध पक्षांच्या नेत्यांसह विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. 


मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा शाही विवाह सोहळा मुंबईत 12 जुलै रोजी पार पडणार आहे.  त्याआधी अनंत-राधिकाचा ग्रँड प्री-वेडिंग सोहळा पार पडला होता. गुजरातमधील जामनगरमध्ये  आणि  परदेशात क्रूझवर प्री-वेडिंग फंक्शन पार पडले होते. या सोहळ्यात देश-विदेशातील अनेक  सेलिब्रिटी, राजकारणी, उद्योजक सहभागी झाले होते. आता, या दोघांच्या ग्रँड विवाह सोहळ्यानिमित्ताने देशातील अनेक दिग्गज राजकारणी उपस्थित राहणार आहेत. काही मुख्यमंत्री, राजकीय नेत्यांना व्यक्तीश: भेट घेत मुकेश  अंबानी यांनी आमंत्रण दिले आहे.


अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या विवाह सोहळ्यात कोण उपस्थित राहणार?


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशाचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड,  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालू प्रसाद यादव, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, आंध्र प्रदेशचे  मुख्यमंत्री  चंद्राबाबू नायडू, आसामचे मुख्यमंत्री हिंमता बिश्वास आदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, केंद्रीय मंत्री यांच्यासह विविध देशांचे राजनयिक उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. 


 राज्यात, 12 जुलै रोजी विधान परिषद निवडणूक पार पडणार आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर महत्त्वाचे नेते विवाह सोहळ्यात कधी हजेरी लावणार, याकडे लोकांचे लक्ष लागले आहे. 


जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार विवाह सोहळा 


अनंत-राधिकाचा विवाहसोहळा 12 जुलै रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. जिओ वर्ल्ड सेंटर या शाही विवाह सोहळ्यासाठी सज्ज करण्यात आले आहे. यानंतर  13 जुलै रोजी  शुभ आशिर्वाद कार्यक्रम पार पडणार आहे. ज्येष्ठ मंडळी सहभागी होऊन नवविवाहित जोडप्याला आशीर्वाद देतील. या ग्रॅण्ड वेडिंगचे ग्रॅण्ड रिसेप्शन 14 जुलै रोजी आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये देशातील आणि जगातील बड्या व्यक्ती सहभागी होणार आहे


वाहतूक व्यवस्थेत बदल...


जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमधील विवाह सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.  भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क, गोदरेज, बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे.त्याशिवाय, भारत नगर, वन बीकेसी, वी वर्क, गोदरेज, बीकेसी येथून जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर गेट क्रमांक 23 कडे जाणारी वाहने अमेरिकन कॉन्सुलेट, एमटीएनएल जंक्शनकडे जाण्यासाठी वाहतूक रोखण्यात आली आहे. 


मुंबई पोलिसांकडून वाहतूक मार्गांविषयीचे माहितीपत्रक काढण्यात आले आहे. यामध्ये म्हटल्यानुसार, 12 जुलै दुपारी 1 वाजल्यापासून ते 15 जुलै दुपारी 12 वाजेपर्यंत हे नियम लागू राहतील. त्यामुळे या वेळेत मुंबईकरांना मुंबई पोलिसांकडून देण्यात आलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करावा लागणार आहे.