मुंबई : अभिनेत्री अमृता रावचे 'विवाह' या चित्रपटातील 'जल लिजिए' वाले मिम्स भारतात सध्या तुफान व्हायरल होत आहेत. आता त्याला आणखी एक निमित्त मिळालं आहे. पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने आपल्या पत्रकार परिषदेमध्ये कोका कोलाच्या बाटल्या बाजूला सारुन त्या ठिकाणी पाण्याच्या बाटल्या ठेवल्या आणि सर्वांना पाणी पिण्याचा सल्ला दिला. या व्हिडीओवर आता अमृता रावचे मिम्स व्हायरल होत आहेत. त्यावर अमृता रावनेही प्रतिक्रिया दिली आहे.
फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोचा पाण्याचा हा व्हिडीओ विवाह चित्रपटातील जल लिजिए या सीनशी जोडला जात आहे. या चित्रपटात अमृता राव ही शाहिद कपूरसाठी पाणी घेऊन येते आणि जल लिजिए असं म्हणते. आता रोनाल्डोच्या व्हायरल व्हिडीओशी हे मिम्स जोडले जात असून ते मिम्स सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. असाच एक मिम अमृता रावनेही शेअर केला असून तिने त्यामध्ये 'Wat'er Are U Saying' अशी मजेदार प्रतिक्रिया दिली आहे. सोबत हसणारा इमोजी शेअर केला आहे.
अमृता रावच्या या ट्वीटवर अनेकांनी मजेदार कमेंट केल्या आहेत.तसेच याला सतरा हजाराहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत. या आधी अमृता रावने तिच्या इन्स्टाग्रामवर जल लिजिए वाला व्हिडीओ शेअर केला होता. चाहत्यांना तो खूप आवडला होता.
ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या या व्हिडीओवर फेव्हिकॉलनेही एक मजेदार ट्वीट करत 'ना बॉटल हलणार, ना शेअर घसरणार' असं लिहित कोका कोलाला टोमणा मारलाय.
काय आहे प्रकरण?
पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोने युरो कपच्या एका सामन्याअगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत टेबलवरच्या कोका कोलाच्या दोन बाटल्या हटवल्या आणि त्या जागी पाण्याच्या बाटल्या ठेवत आपली नाराजी व्यक्त केली. त्याने पाण्याची बाटली उचलत लोकांनी कोल्ड ड्रिंक नाही तर पाणी पिण्याचा सल्ला दिला. रोनाल्डोच्या या 25 सेकंदाच्या कृतीनंतर कोका कोलाचे शेअर अंदाजे 4 बिलियन डॉलर पर्यंत शेअर घसरले.
महत्वाच्या बातम्या :