मुंबई : राज्यात आजपासून 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणास सुरुवात होणार आहे. शासकीय लसीकरण केंद्राच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे. यामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील 10 शासकीय लसीकरण केंद्रावर 30 ते 44 वयोगटातील नागरिकांना लस दिली जाईल. या 10 लसीकरण केंद्रावर नागरिकांना सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत कोव्हीशिल्ड लसीचा पहिला डोस दिला जाणार आहे. 10 लसीकरण केंद्रावर कोव्हीशिल्ड लशींचे प्रत्येकी दिवसाला 200 डोस आजपासून उपलब्द असतील.
शासकीय लसीकरण केंद्रावरील लसीकरणासाठी पूर्वनोंदणी ही ऑनलाईन आणि प्रत्यक्ष केंद्रावर जाऊन देखील करता येणार आहे. 30 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरण सत्रांचे नियोजन करण्याकरिता कोविन ऍप मध्ये आवश्यक ते बदल करण्यात येणार आहेत. दुसरीकडे 45 वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण नियमितपणे सुरू राहणार असल्याचं काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
Goa Travel : गोव्यात पर्यटनाला सुरुवात केव्हा होणार? जायचा बेत आखताय, 'हे' नक्की वाचा
मुंबईत कुठे होणार लसीकरण?
मुंबईतील प्रियदर्शनी पार्क- वाळकेश्वर, बीएमसी मुरली देवरा नेत्र रुग्णालय-कामठीपुरा, अकवर्थ लेपरसी-वडाळा, सेठ आयुर्वेदिक रुग्णलाय- सायन, केबी भाभा रुग्णालय- बांद्रा, एम डब्ल्यु देसाई रुग्णालय- मालाड, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले रुग्णालय - बोरिवली ,देवनार मॅटर्निटी होम- देवनार, जॉली जिमखाना-विद्याविहार, वि.दा. सावरकर रुग्णालय- मुलुंड या दहा लसीकरण केंद्रावर 30 ते 44 नागरिकांचा लसीकरण सुरू होत आहे. 18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाबाबत प्राधान्यक्रम ठरविण्याची मुभा केंद्र शासनाने राज्यांना दिली आहे. त्यानुसार राज्याच्या आरोग्य विभागाने आजपासून सुरवातीला लसीकरणाच्या नियोजनासाठी वयोगटाचा टप्पा निश्चित केला आहे.
1 मे पासून तिसऱ्या टप्यात 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींच्या लसीकरणाला देशभरात सुरुवात झाली होती. मात्र, लशींच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे मुंबईत 18 ते 44 वयोगटातील व्यक्तींचा लसीकरण शासकीय लसीकरण केंद्रावर काही दिवसांसाठी बंद ठेवण्यात आला होता. लशींच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू असताना प्राधान्याने 45 वयोगटावरील व्यक्तींना लस दिली जात आहे. आता लशींच्या पुरवठ्याचे सर्व अधिकार केंद्र सरकारकडे असल्याने 21 जूनपासून मुबलक प्रमाणात लस मिळणार असल्याने टप्याटप्याने 45 वयोगटाखालील व्यक्तींचे लसीकरण पुन्हा एकदा सुरू होत आहे. त्यामुळे, सुरुवातीला आजपासून 30 ते 44 वयोगटातील व्यक्तींचा मोफत लसीकरण शासकीय लसीकरण केंद्रावर सुरू केले जात आहे