Amol Kolhe : महाराष्ट्र शासनाचा 'महाराष्ट्र भूषण पुरस्कार' यावेळी तुम्ही अशोक सराफ (Ashok Saraf) यांच्यासारख्या अभिनेत्याला दिला. मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही ते सेलिब्रिटी होते म्हणून दिला, असं म्हणणार का?, असा सवाल अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी उपस्थित केला आहे. तसेच काका डॉक्टर होता म्हणून MBBS डिग्री नाही मिळाली, असं म्हणत त्यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर निशाणा साधला आहे.
अमोल कोल्हेंनी अजित पवारांवर साधला निशाणा
अमोल कोल्हे म्हणाले,"माझा काका कोणीतरी फार मोठा अभिनेता आहे म्हणून मला बोटाला धरून आणलं आणि मला अभिनेता केलं असं घडलेलं नाही आहे. मी स्वत:च्या कष्टाने केलं आहे. मी MBBS केलं. माझा काका कोणीतरी डॉक्टर होता म्हणून मला MBBS ची सीट मिळालेली नाही. मी स्वत:च्या कष्टाने डॉक्टर झालो आहे. या सगळ्या शिक्षणानंतर जेव्हा तुम्ही खूप सहज सॉफ्ट टार्गेट करू शकता. आज मी एक विधान ऐकलं की, राजकारणाचा पिंड नाही. म्हणजे काय? माझं भ्रष्टाचारात नाव आलं नाही, म्हणजे माझा राजकारणाचा पिंड नाही का? आमच्यासारख्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातल्या पोरांनी ज्यांचा काका राजकारणात नसेल त्यांनी स्वप्नचं पाहायची नाही का? त्यांनी समाजकारणात यायचं नाही का? त्यांनी राजकारणात यायचं नाही का? आमचा राजकारणाचा पिंड आहे की नाही हा शिक्का मारणारे तुम्ही कोण? हा सवाल सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातून येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात येणं स्वाभाविक आहे".
"आज संसदेत उभं राहून ज्या मतदारसंघाने माझ्यावर विश्वास ठेवला त्या मतदारसंघाचे प्रश्न पोटतिडकीने मांडताना आपण सगळे जण मला पाच वर्षे पाहत आहात. पहिल्याच टर्ममध्ये दादांनी आज अनेक सेलिब्रिटींची नावे घेतली. त्यांनी एक उदाहरण असंही दाखवावं सेलिब्रिटीचं की त्या सेलिब्रिटीला संसदरत्न पुरस्कार त्याच्या पार्लमेंट्री परफॉर्मेसमुळे मिळाला आहे. जर मला तीनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे तर यामध्ये आमच्या नेत्या, खासदार सुप्रिया ताई सुळे यांचं मार्गदर्शन प्रचंड मोलाचं आहे. पण एक सेलिब्रिटी म्हणून जेव्हा तुम्ही हिणवता. तर तुम्ही या वस्तुस्थितीचा इनकार कसा करता".
अमोल कोल्हेंचा अजितदादांवर पलटवार
अमोल कोल्हे पुढे म्हणाले,"मग यावेळी महाराष्ट्र भूषण पुरस्कार देताना तुम्ही अशोक सराफ यांच्यासारख्या अभिनेत्याला दिला. मग उद्या अशोक सराफांनी तुमच्या विरोधात भूमिका घेतली तर तुम्ही तेच म्हणणार का? सेलिब्रिटी होता म्हणून. त्यामुळे मला असं वाटतं की यापद्धतीने सॉफ्ट टार्गेट करण्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे? पार्लेमेंट्री परफॉर्मन्स काय आहे? आणि सातत्याने हे मांडत असताना आपल्या मतदारसंघाचे प्रश्न संसदेत मांडणं हे फार गरजेचं आहे".
संबंधित बातम्या