मुंबई : कधीही न झोपणारी मुंबई आज किती निपचिप पडल्याचं दिसतंय अशी भावना बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी व्यक्त केली. मुंबईत आणि राज्यात शुक्रवारी रात्रीपासून दोन दिवसीय कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्यामुळे कायम गजबजणाऱ्या मुंबईत शुक्रवारी रात्रीपासून रस्त्यावर प्रचंड शुकशुकाट दिसला. त्यावर बीग बींनी आपल्याला मुंबई शांत भासतेय असं सांगितलं.


बीग बींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुंबईत सुरू असलेल्या दोन दिवसीय लॉकडाऊनवर आणि त्याचा मुंबईवर झालेल्या परिणामावर आपल्या भावना व्यक्त केल्या. 


 






शुक्रवारी रात्री आठ वाजल्यापासून मुंबईत दोन दिवसीय कडक लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. दिवसेंदिवस वाढत जाणारी कोरोनाबाधितांची संख्या रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'ब्रेक द चेन' मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेतंर्गत राज्यात पाच दिवस कडक निर्बंध आणि शनिवार, रविवार वीकेण्ड लॉकडाऊन पाळण्यात येणार आहे. हा दोन दिवसाचा विकेण्ड लॉकडाऊन सोमवार (12 एप्रिल) सकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. वीकेण्ड लॉकडाऊनमुळे कायम गजबजलेल्या मुंबईच्या रस्त्यावर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.


कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्रीमंडळाने काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिलला सुरू झालेले हे कडक निर्बंध 30 एप्रिलपर्यंत लागू असणार आहेत. हे निर्बंध लावताना सर्व घटकांची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे, सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील. मात्र, खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.


महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचं चित्र आहे. राज्यात शुक्रवारी 58, 993 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे नवीन 45391 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण 2695148 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात सध्या एकूण 534603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 81.96% झाले आहे. गुरूवारी 56 हजार 286 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात शुक्रवारी 301 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनामुळं 57,329 लोकांना आपला जीव गमावावा लागला आहे. तर राज्यात  5,34,603 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर राज्यात 2,16,31,258 एवढ्या टेस्ट झाल्या आहेत. 


महत्वाच्या बातम्या :